अवैद्य गौण खनिज वाहतूक बंद करून भयमुक्त रस्त्यासाठी दुरशेत ग्रामस्थांचे नदीत उतरून जलसमाधी आंदोलन !
आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत २२ जुलै रोजी बैठक

मुंबई – गोवा महामार्गापासून दुरशेत गावाकडे जाणाऱ्या हक्काच्या सुस्थितीत रस्त्यासाठी आणि यासह इतर मागण्यांसाठी आज पेण तालुक्यातील दुरशेत गावातील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात दुरशेत गावातील शेकडोच्या संख्येने महिला, पुरुष, शाळेतील विद्यार्थी व जेष्ठ मंडळी सहभागी झाली होती. ग्रामस्थांनी नदी पात्रात उतरून जलआंदोलन केले. यावेळी पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांबाबत येत्या २२ तारखेला मंगळवारी बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्यात येईल असे सांगितले.
दुरशेत गावाच्या वरील बाजूस असलेल्या अनेक दगड खाणींच्या दररोज चालणाऱ्या ३०० ते ३५० ओव्हरलोड गाड्यांमुळे खराब झालेला रस्ता, गौण खनिज प्लॅन्ट मुळे ऐतिहासिक किल्ल्याला उद्भवणारा धोका, भरण्यात येत असणारी तुरळक रॉयल्टी आदी महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात मागील १७ जून रोजी याच ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले होते. त्यावेळी जी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता न झाल्याने अखेर आज या ग्रामस्थांना आपला लढा तीव्र करून जलसमाधी आंदोलन करण्यास भाग पडले.

सदर आंदोलनकर्त्यांनी काही तास वाट पाहिल्यानंतर देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने असह्य होऊन नदीपात्रात उद्या मारल्या. त्यानंतर बऱ्याच वेळाने पेण चे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलन ठिकाणी येऊन सविस्तर चर्चा करून विषय समजून घेतला आणि ज्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत. त्यावर येत्या मंगळवारी म्हणजेच २२ जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.
सदर आंदोलन प्रसंगी प्रशासनाच्या वतीने विभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, दादर सागरी पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणेसह मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा हजर होता. तर जल आंदोलन असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेण पालिकेचे अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापनातील बोट तैनात ठेवण्यात आली होती. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, डॉ. वैशाली पाटील, प्रसाद भोईर (रायगड जिल्हा प्रमुख उबाठा), संदीप ठाकूर (मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष), देविदास पाटील, मोहिनी गोरे, महेश पाटील, राजू पाटील, राजेश रसाळ, सचिन पाटील, मानसी पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.

मागील २ वर्षांपासून पेण तालुक्यातील दुरशेत ग्रामस्थ अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या दहशतीखाली वावरत असताना वारंवार प्रशासनाला विनंत्या-अर्ज करुन देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा निषेध आणि भयमुक्त रस्त्याच्या मागणीसाठी दुरशेत ग्रामस्थांनी मागील महिन्यात दुरशेत फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी तहसीलदार पेण यांनी दुरशेत ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य पुढील पंधरा दिवसात दगड खान मालकांना त्यांच्या स्वतंत्र रस्ता बनवण्यासंबंधीचे पत्र काढले परंतु एक महिना उलटूनही पर्यायी रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली नाही याउलट ग्रामस्थांना विश्वासात न घेता बाळगंगा नदीत जे.एस.डब्ल्यू चा प्रदूषणकारी स्लॅग चा भराव करून आधीच पूरग्रस्त असलेल्या दुरशेत गावाला दगडखान मालकांकडून पाण्यात बुडवन्याचा प्रयत्न होत असताना तहसीलदार किंवा महसूल अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप न केल्यामुळे आधीच जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या दूरशेत ग्रामस्थांनी अवैद्य गौण खनिज वाहतूक बंद करून भयमुक्त रस्त्यासाठी आज हे जल समाधी आंदोलन केले. – संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते, पेण



