पेण येथील ट्री हाऊस हायस्कूलच्या पहिल्या बॅचने मिळवले उज्वल यश
शाळेच्या १००% निकालाने मान उंचावली – अध्यक्षा शर्मिला पाटील
पेण येथील ट्री हाउस हायस्कूल (CBSE बोर्ड) ची यंदाची पहिलीच बॅच अत्यंत यशस्वी ठरली असून विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल लावून शाळेचे नाव अभिमानाने उंचावले आहे. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या यशामुळे शाळेच्या वाटचालीला एक भक्कम सुरुवात मिळाली आहे.
या परीक्षेत प्रथम क्रमांक कौशल पोटे (९३%) तर द्वितीय क्रमांक आराध्या सिंग (९१%) यांनी पटकावला.तर सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा लौकिक वाढवला. शाळेच्या अध्यक्षा सौ. शर्मिला वैकुंठ पाटील यांनी सांगितले की, “ही आमच्या शाळेची पहिलीच बॅच असून, विद्यार्थ्यांनी १०० निकाल लावून मिळवलेले यश हा त्यांच्या कष्टांचा, पालकांच्या विश्वासाचा आणि शिक्षकांच्या अथक मेहनतीचा परिणाम आहे.पहिल्याच वर्षी मिळालेलं हे यश आमच्यासाठी खूप अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद सभापती वैकुंठशेठ पाटील यांनी स्कूल चा १०० टक्के निकाल लागल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे व शाळेच्या शिक्षकांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षकांनी ही विद्यार्थ्यांचा नियमित सराव घेऊन योग्य मार्गदर्शन देत त्यांची भक्कम तयारी करून घेतली होती. विद्यार्थ्यांनीही शिस्त, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकांनी शाळा व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले असून, पुढील काळातही अशीच उज्ज्वल परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, शाळेच्या अध्यक्षा शर्मिला पाटील प्रिन्सीपल अर्चना चव्हाण, पालक, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.



