अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना पेण तालुका शिवसेने तर्फे श्रद्धांजली !
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द
प्रतिनिधी, पेण
अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरू व वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पेण तालुका शिवसेनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुःख व्यक्त करत कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पेण तालुका शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवशी होणारे सर्व कार्यक्रम रद्द केल्यामुळे हा उपक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांनी दिली.
यावेळी पुढे बोलताना समीर म्हात्रे म्हणाले की, “ही दुर्घटना अत्यंत दुःखद असून शिवसेना संपूर्णपणे शोकाकुल कुटुंबीयांच्या पाठीशी आहे.”
या श्रद्धांजली सभेला जिल्हा समन्वयक नरेश गावंड, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, भगवान पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, वैशाली समेळ, राजश्री घरत, मेघना चव्हाण, युवा सेनेचे निलेश म्हात्रे, योगेश पाटील, कांतीलाल म्हात्रे, चेतन मोकल, समीर साटी, प्रथमेश पोटफोडे, कृतेश खाडे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.



