पेण तालुक्यातील गणपती बाप्पा व गौराई मातेला भावपूर्ण वातावरणात निरोप !
विश्वेश्वर विसर्जन घाट बंद केल्याने कासार तलावात वाढले प्रदूषण ; कृत्रिम तलावाकडे गणेश भक्तांची पाठ.

अरविंद गुरव, पेण
गेले ५ दिवस आपल्या भक्तांच्या घरी पाहुनचारासाठी आलेला गणपती बाप्पा आज आपल्या लाडक्या भक्तांना सोडून ‘पुढल्या वर्षी लवकर येईन’ असे वचन देऊन निघाला. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतांना काही भक्तांचे डोळ्यात अश्रु दिसले. मात्र पुढल्या वर्षी लवकर या असे मागणे मागत साश्रु नयनांनी लाडक्या बाप्पाला आज असंख्य भक्तांनी निरोप दिला.
रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”….. “गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला” “मंगलमूर्ती मोरया”, “पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला” अशा जयघोषात गणपती बाप्पा आणि गौराईला निरोप देण्यात आला. कुठे ढोल ताशांचा गजर, कुठे गुलाल, फुलांची उधळण तर कुठे भजनांच्या तालावर वाजतगाजत आनंदी वातावरणात नदी, तलाव, खाडी व समुद्रकिनारी गणपती बाप्पा व गौराई मातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

पेण तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात गणेशोत्सव मोठया भक्तिभावाने साजरा करण्यात आला. दीड दिवसाच्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जनानंतर सोनपावलानी आलेल्या गौराई माता व पाच दिवसाच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. आज सुमारे ३००० हजारांहुन अधिक गणेश मूर्तिंचे विसर्जन पेण शहरात करण्यात आले. विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस प्रशासनासह स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेतली होती. विसर्जन स्थळाची साफसफाई करण्यात आली होती. निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश ठीक ठिकाणी ठेवण्यात आले होते.
विश्वेश्वर विसर्जन घाट बंद केल्याने कासार तलावात वाढले प्रदूषण !
पेण येथील विश्वेश्वर येथे असणारा विसर्जन घाट बंद केल्याने पूर्वापार येथे होणारे गणेशमूर्तिंचे विसर्जन पेण शहरातील गणेश भक्तांकडून आज शहरात असणाऱ्या कासार तलावात करण्यात आले. सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे ५५० हुन अधिक गणेशमूर्तिंचे विसर्जन या तलावात करण्यात आले होते. हा आकड़ा रात्रि उशीर पर्यंत वाढण्याचीही शक्यता आहे. आज झालेल्या विसर्जनामुळे कासार तळ्यामध्ये बेसुमार निर्माल्य पडले होते. तसेच पाण्यावर काही गणेशमूर्ती तरंगतानाही दिसत होत्या. कासार तळ्यावर कृत्रिम तलावाची उभारणी केली होती मात्र गणेश भक्तांनी या कृत्रिम तलावाकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते. विश्वेश्वर विसर्जन घाट बंद केल्याने कासार तलावात प्रमाणापेक्षा जास्त गणेशमूर्तिंचे विसर्जन आज करण्यात आले होते यामुळे तलावामध्ये बेसुमार प्रदूषण झाले होते.


