जेएसडब्लू कंपनीत डोक्यात लोखंडी पाईप पडून कामगाराचा मृत्यू !
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न एरनीवर.
अरविंद गुरव, पेण
पेण तालुक्यातील वडखळ येथील जेएसडब्ल्यू कंपनीत २९ मे रोजी सकाळच्या सुमारास अपघात घडला. यामध्ये अरवली टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे वेल्डिंगचे काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यात लोखंडी पाईप पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये अरवली टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे वेल्डिंगकाम करणाऱ्या मनोज आत्मराम ठाकूर वय ४० वर्षे रा. ठाकूर बेडी, वाढव ता. पेण. याच्या डोक्यात लोखंडी पाईप पडून जखमी झाला असता त्याला उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी दुपारी १२:२५ वाजता घोषित केले.
या घटनेमुळे जेएसडब्ल्यू कंपनीत कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न एरनीवर आला आहे. कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासन घेत नसल्याचा आरोप येथील ठेक्यावर कामकरणाऱ्या कामगारांनी केला आहे. दरम्यान वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.नं. १८/२०२६ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून. पेण उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुल आणि पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक वडखळ पोलीस ठाणे हे पुढील तपास करीत आहेत.

