शिवसेना उरण विधानसभेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट योजना अभियानाला जोरदार सुरुवात.
संजय कदम, पनवेल
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली यात प्रत्येक महिलेला दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. आणि ती महिला निर्भय आणि आर्थिक स्वावलंबी होणार आहे. या योजनेला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे आणि बहिणींनी या योजनेचे जोरदार स्वागत केले आहे. मात्र काही समाजकंटक आणि विरोधिपक्षातील नेते ह्याबाबत राजकारण करतांना दिसत आहेत ह्यालाच प्रतिउत्तर म्हणून मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या आदेशाने समस्त महाराष्ट्रातील शिवसैनिक आता या योजनेचा लाभ घेलेल्या बहिणीकडे त्यांच्या घरी कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात आहे.
या भेटीत त्या बहिणीला इतर अनेक योजनांची माहिती दिली जात आहे. योजनेबाबत विरोधकांनी पसरविलेले गैरसमज दूर केले जात असून घरातील वयोवृद्धांसाठी वयश्री योजना सांगून त्याचे फॉर्म भरले जात आहेत. घरातील युवती जी कॉलेज ला शिकत आहे तिचे सरकार मार्फत मोफत शिक्षण होणार आहे. याबाबत माहिती दिली जात आहे. तसेच घरातील तरुण युवकाला स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारची युवा प्रशिक्षण योजना सांगितली जात आहे. याच बरोबर सरकारच्या इतर योजना यांचा प्रसार व प्रचार केला जात आहे. एकूणच एका संपूर्ण कुटुंबाला योजनांच्या माध्यमातून स्वावलंबी कुटूंब बनविण्यासाठी ही लाडकी बहीण कुटुंबभेट योजना राबवली जात आहे, युवासेनेचे राज्य सचिव तथा या योजनेचे कोकण समन्वयक, उरण विधानसभेचे पक्षाचे निरीक्षक रुपेश पाटील यांच्या निरीक्षणाखाली ही मोहीम गावागावात राबविली जात आहे.
शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी, महिला उपजिल्हा प्रमुख वैजयंती ठाकूर ज्या ह्या योजनेच्या उरण विधानसभेच्या अशासकीय सदस्या आहेत. विधानसभा संघटक मनोज घरत, सह संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, तालुका प्रमुख महेंद्र पाटील, सोनल घरत, कृष्णा पाटील, अक्षय म्हात्रे व शिवसेना- महिला आघाडी- युवासेना पदाधिकारी प्रत्येक गावागावात जाऊन ही भेट घेत आहेत आणि आलेल्या समस्यांबाबत तहसील व बँक प्रशासना सोबत चर्चा ही करत आहेत. याबाबत सर्व अहवाल लाभ मिळालेल्या बहिणींची आकडेवारी, समस्या यांचा सगळा अहवाल हा वरिष्ठांना निरीक्षक रुपेश पाटील यांज कडून दिला जात आहे.



