१९१-पेण-सुधागड-रोहा मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी !
शेकाप तर्फे अतुल म्हात्रे तर शिवसेना (ठाकरे गट) कडून प्रसाद भोईर यांनी भरले उमेदवारी अर्ज.
अरविंद गुरव, पेण
आज १९१-पेण-सुधागड-रोहा मतदार संघात महाविकास आघाडी च्या दोन पक्षातील नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात शिवसेना (ठाकरे गट) कडून प्रसाद भोईर आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडून अतुल म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी झाली असल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बिघाडीचा फायदा महायुतीमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रविशेठ पाटील यांना होणार असल्याचे चित्र सध्या या मतदार संघात आहे. पण तुर्तास ४ नोव्हेंबरची वाट पहावी लागणार आहे.

आज शेतकरी कामगार पक्षा तर्फे अतुल म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शेकापच्या कार्यालयातून निघालेल्या रॅलीमध्ये पेण आणि सुधागड तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. ही रॅली शक्तिप्रदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाऊन महात्मा गांधी वाचनालयाच्या पटांगनात या रॅलीचे रुपांतरण सभेमध्ये झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अत्यंत कमी वेळात पेण,सुधागड आणि रोहा तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यामुळे त्यांचे आभार मानून विजय पक्का असल्याचे सांगितले. तसेच या मतदार संघामध्ये येणाऱ्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी कवडीमोल भावाने न विकता येणाऱ्या प्रकल्पामध्ये येथील स्थानिक शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून तो प्रकल्प राबविला जावा. विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्या शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे आणि येथील शेतकरी उद्योजक बनला पाहिजे असे अतुल म्हात्रे यांनी सांगितले. या सभेला शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जेष्ठ नेते पी.डी. पाटील, तालुका चिटणीस महादेव दिवेकर, ऍड. रोशन म्हात्रे, दीपक पाटील, निलेश म्हात्रे आदीसह शेकापचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे प्रसाद भोईर यांनीआपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण पवार यांच्याकडे दाखल केला. यावेळी शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. तसेच माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रसाद भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी प्रसाद भोईर यांनी पत्रकारांना सांगितले की, या मतदार संघाला आता नविन चेहऱ्याची गरज आहे. येथील राखडलेली जनहिताची कामेमार्गी लावण्यासाठी या मतदार संघातील तरुण मतदारांची ऊर्जा या मतदार संघाला सकारात्मक दिशेने घेऊन जाण्यासाठी एक आश्वासक नेतृत्व म्हणून माझी निवड निश्चितच करणार आहे. मला या मतदार संघातून नागरिकांचे प्रेम मिळत आहेच पण त्याच बरोबर आता शिवसेना (ठाकरे गट) मधील कट्टर शिवसैनिकांची साथ मिळाली आहे त्यामुळे माझा विजय निश्चित होणार असल्याचे प्रसाद भोईर यांनी सांगितले.
यावेळी सह संपर्कप्रमुख किशोर जैन, रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावंड, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर, विधानसभा अध्यक्ष लहू पाटील, तालुका समन्वयक दिलीप पाटील, विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे यांसह हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.




