पेणमध्ये निकालाची नागरिकांमध्ये उत्सुकता.
कोण होणार नगराध्यक्ष? मतमोजणीकडे सर्वाचे लक्ष !
अरविंद गुरव, पेण
पेण शहराच्या राजकीय इतिहासात उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या (दि. २१) होणाऱ्या मतमोजणीतून शहराचा नगराध्यक्ष कोण होणार, तसेच प्रभागनिहाय विकासाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला होणार आहे. त्यामुळे केवळ उमेदवारच नव्हे, तर संपूर्ण शहराचे लक्ष उद्याच्या निकालाकडे लागले आहे. २ डिसेंबरला मतदारांनी आपला कौल मतदानयंत्रात बंद केला होता. विकास, बदल, नेतृत्व, विश्वास आणि भ्रष्टाचार, पेण अर्बन बँक घोटाळा या मुद्द्यांवर मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे उद्या स्पष्ट होणार आहे.
निवडणूक केवळ एक राजकीय प्रक्रिया नसून, शहराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचा कौल म्हणून पाहिली जात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार तसेच शहराच्या मूलभूत सुविधांबाबत कोण प्रभावी भूमिका बजावू शकतो, याचा गांभीर्याने विचार मतदारांनी केल्याचे दिसून येते. शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांचे मुद्दे केंद्रस्थानी राहिले. अनेक ठिकाणी अपूर्ण कामे व रखडलेले प्रकल्प, तर काही भागांत झालेली विकासकामे हेच प्रचाराचे मुख्य मुद्दे ठरले. ‘काम केले की नाही’ या एकाच प्रश्नावर अनेक उमेदवारांची राजकीय परीक्षा झाली आहे.
या निवडणुकीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर नवीन आणि तरुण उमेदवारांचे मैदानात उतरले होते. अनेक तरुण प्रथमच नगरपालिकेत प्रवेश करण्याच्या तयारीत असून, त्यांनी ‘बदल’, ‘नवीन विचार’ आणि ‘पारदर्शक कारभार’ या मुद्द्यांवर प्रचार केला. तरुण मतदारांमध्येही या उमेदवारांविषयी विशेष उत्सुकता दिसून आली. उद्याचा निकाल नव्या नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करतो की अनुभवी चेहऱ्यांनाच पुन्हा संधी देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता
मतमोजणी उद्या (दि. २१) सकाळी पार पडणार असून, सकाळी १२ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निकाल जाहीर होताच शहराच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी पेण नगरपरिषदेच्या निवडणुक प्रचारामध्ये जोरदार कमबॅक केल्यामुळे आणि विरोधकांवर “लाव रे तो व्हिडिओ” च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केल्यामुळे पेण निवडणुकीमध्ये सत्ता पालट होणार असल्याची चर्चा पेणमध्ये सुरु आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, काही ठिकाणी विजयाचा आत्मविश्वास तर काही ठिकाणी चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.



