रायगडच्या समुद्रात संशयास्पद बोट? रात्रभर पोलिसांची धावपळ !
राजमुद्रा न्यूज नेटवर्क, रायगड
रायगड जिल्ह्याच्या कोर्लई भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्लईच्या समुद्रात रडारवर एक संशयास्पद बोट आढळून आली. या बोटमधील काही लोक भारतीय समुद्र किनाऱ्यावर उतरल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. कोर्लई येथील रडार यंत्रणेत ही बोट दिसल्यानंतर रायगड पोलिसांची रात्रभर धावाधाव झाली. जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आल्या आहेत.
कोर्लईच्या समुद्रात संशयित बोट दिसल्यानंतर रायगड पोलीस आणि इतर सुरक्षा दलाने जागोजागे नाकाबंदी आणि झाडाझडती घेतली आहे. सध्या कोर्लई समुद्र किनारी कोणतीही संशयास्पद स्थिती नाही. मात्र रात्री उशिरा याठिकाणी बोट आढळून आल्यानंतर रायगड पोलिसांची धावपळ झाली. यानंतर ही बोट आणि रायगड पोलीस घटनास्थळावरून निघून गेले. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता पोलिसांकडून कोणतीही माहिती दिली जात नाहीये. याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोर्लई इथे रविवारी रात्री उशिरा खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली. यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या बोटीतून काही व्यक्ती भारतीय किनाऱ्यावर उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले.



