ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांकडून आज महामार्ग पाहाणी दौऱ्याचा फार्स !

पण महामार्ग पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह कायम

अरविंद गुरव, पेण

गेली सुमारे १७ वर्षे काम सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पार पाडली. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील कोकणवासीय या उत्सवासाठी आपल्या गावी जातात. त्यातच रखडलेल्या कामांमुळे या महामार्गावर खड्डेही खूप असल्याने गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक पार पडली. त्यात मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यात आला होता. हे दोन्ही महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे निर्देश त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याचअनुषंगाने एकनाथ शिंदे आज, सोमवारी सकाळी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमधील कामांची पाहाणी केली.

फडणवीस सरकारच्या काळातही चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाममंत्री असताना कंत्राटदारांना वेगवेगळ्या मुदती दिल्या जात होत्या. शिवाय, निर्धारित वेळेत काम पूर्ण न झाल्यास बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी तसेच कंत्राटदारांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी वेळोवेळी दिला. पण प्रत्यक्षात मात्र या महार्गाची स्थिती बदलली नाही. नंतर शिंदे सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाममंत्री असणारे रविंद्र चव्हाण यांनी मागील वर्षी गणेशोत्सवापूर्वी दोन महिन्यांत तब्बल ७ वेळा या महामार्गाच्या पहानी दौरा केला होता. मागील वर्षी नविन तंत्रज्ञानापासून महामार्ग गणेशोत्सवापूर्वी बनविण्याच्या आनाभाका घेतल्या मात्र महामार्गाची साध्य स्थिती मागील वर्षी पेक्षा अतिशय खराब झाली आहे. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाहाणीनंतर, निवडणुकीच्या तोंडावर तरी प्रवास काहीप्रमाणात सुखकर होईल, अशी कोकणवासीयांना आशा आहे. तरीही महामार्ग नेमका केव्हा पूर्णत्वास जाईल ? हे मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.

नितीन गडकरींच्या दाव्याचे काय झाले?
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई- गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार, असा प्रश्न समस्त कोकणवासीयांना पडला असतानाच, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मे महिन्यात याची तारीख जाहीर केली होती. जून महिन्याच्या अखेरपर्यंत हा महामार्ग तयार होणार असल्याचा दावा त्यांनी उत्तर मध्य मुबंईतील महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांच्या प्रचारसभेत केला होता. चिपळूणचा उड्डाणपूल सोडून मुंबई- गोवा महामार्गाचे संपूर्ण काम जून अखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर मुंबईतून गोव्याला पोहोचणे पाच तासांत शक्य होणार आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याच्या कामाची पाहाणी केली आहे, हे उल्लेखनीय !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!