राजकीय

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून केला निषेध !

कोकणवासीयांना खड्ड्यातून प्रवास करायला लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांना गनिमी कावा करीत दाखविले काळे झेंडे

राजेश प्रधान, पेण

तब्बल १७ वर्ष कोकणवासीयांना व चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यातून प्रवास करायला लावणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी सोमवारी पेण तालुक्यातील वाशी नाका येथे मुंबई गोवा महामार्गाची पहाणी करण्याकरिता आलेल्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.

मुंबई गोवा महामार्गावर असलेले पेण तरणखोप येथील गिरोबा हॉटेल येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध प्रदर्शनाकरिता जमले होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात होता. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यापूर्वीच  पोलिसांनी कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे गनिमी काव्याची आखणी करून  शिवसैनिकांची दुसरी टीम तयार केली व गनिमी कावा करीत वाशी नाक्यावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत घोषणा देत निषेध नोंदविला. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्याने पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे मागील १७ वर्षात अनेक निष्पाप प्रवाशांचा बळी गेला आहे. मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल सात वेळा या महामार्गाची मॅरेथॉन पाहणी केली होती परंतु हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा या महामार्गाची अवस्था बिकट असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आज मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील यांनी यावेळी दिली.

केवळ मतांचा मलिदा मिळवण्याकरिता महामार्गाच्या पहाणी दौरा !

रायगड तसेच कोकणवासीयांची दिशाभूल करण्याकरिता मतांचा मलिदा मिळविन्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा पहाणी दौरा असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी केला. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, युवासेनेचे आमिर ठाकूर, कैलास गजने, प्रकाश पाटील, धनंजय गुरव, दर्शना जवके, मेघना चव्हाण, वैशाली समेळ, छाया काईनकर, काँग्रेसचे चंद्रकांत पाटील, नंदा म्हात्रे, तालुका अध्यक्ष अशोक मोकल, पाली तालुका प्रमुख दिनेश चिले, पाली शहर प्रमुख विद्येष आचार्य, राजाराम पाटील, नंदु मोकल, लवेद्र मोकल, गजानन मोकल, चंद्रहास म्हात्रे, शिवाजी म्हात्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!