प्रथमच ‘स्व-गणने’चा पर्याय!
नागरिकांनी स्व – गणना करुन प्रशासनाला सहकार्य करावे – तानाजी शेजाळ, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी-पेण

अरविंद गुरव, पेण
राज्यात १ मेपासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यावेळी प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा टप्पा ऐच्छिक असणार असून १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरून स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे.
पेणचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी तानाजी शेजाळ यांनी पेण येथे पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. देशातील ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना ठरणार असून नागरिकांच्या सहभागाला यामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जनगणना प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले आहे.
या जनगणनेसाठी सुमारे ३५० पर्यावेक्षक / प्रगणक यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी पत्रकारांना दिली.
स्व-गणना कशी कराल?
संकेतस्थळ:se.census.gov.in/ एका कुटुंबासाठी एकच अर्ज एकूण ३३ प्रश्नांची माहिती भरावी लागेल. ती अचूक भरा. कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाहीमाहिती पूर्ण भरल्यावर तुम्हाला ११ अंकी युनिक आयडी मिळेल.हा आयडी पुढील पडताळणीसाठी जतन करून ठेवणे आवश्यक.
‘घरगणना’ कधी?
१६ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत जनगणना अधिकारी घरोघरी जाऊन ‘घरगणना’ करतील. स्व-गणना केली आहे, त्यांच्या माहितीची पडताळणी केली जाईल. यावेळी युनिक आयडी दाखवणे आवश्यक असेल. तर स्व-गणना न केलेल्या नागरिकांची माहिती अधिकारी स्वतः भरून घेतील.

