लुटमार करणार्या टोळीतील सहाव्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड !
संजय कदम, पनवेल
दिवसा नोकरी करून रात्रीच्यावेळी एक्सप्रेस महामार्गावर लूटमार करणार्या एका सराईत टोळीतील ६ व्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग, पुणे लेनवर ट्रक क्र एम.एच १५ के क्यु ५००८ वरील चालक फिर्यादी गेंदलाल रामगरीब पटेल (वय ३५ वर्षे रा. मध्यप्रदेश) हे लघुशंके करता पळस्पे हायवे पोलीस चौकी च्या २०० मिटर पुढे थांबले असता अज्ञात ५ ते ७ इसमांनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून, हात बुक्क्यांनी मारहाण करून व जमिनिवरुन फरपटत नेवुन, जखमी करुन त्याचे कडील २ मोबाईल हॅन्डसेट व २३ हजार रुपये रोख रक्कम मारहाण करुन जबरी चोरी केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच सदर दाखल गुन्हयाचा तपास पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अति. पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांच्या आदेश व सुचनांप्रमाणे तसेच पोलीस उप आयुक्त, परि. २, प्रशांत मोहिते व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांचे नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले होते.
सदर पथकातील पोनि (गुन्हे) सतीश शेलकर, सपोनि अनुरूद्ध गिजे, पोउपनि हर्षल राजपुत, पोहवा विजय देवरे, पोहवा सुनिल कुदळे, पोहवा महेश धुमाळ, पोहवा शिवाजी बाबर, पोहवा सतिश तांडेल, पोशि राजकुमार सोनकांबळे, पोशि आकाश भगत, पोशि भिमराव खताळ, पोहवा वैभव शिंदे, पोशि प्रविण पाटील यांनी वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सदर गुन्हयाचा तांत्रिक व गोपनिय माहितीद्वारे तसेच गुन्हयातील फिर्यादी ट्रक चालक याचेकडे सखोल व कौशल्यपूर्ण तपास आणि वेषांतर करून खालापूर परिसर पिंजून काढला असता गुन्हयातील एकुण ८ आरोपींना निष्पन्न करून त्यापैकी आरोपी रोहन उर्फ गुड्डु गोपीनाथ नाईक (वय २४ वर्षे), रोहिदास सुरेश पवार (वय २३ वर्षे), आतेश रोहिदास वाघमारे, (वय २६ वर्षे,) मनिष काळुराम वाघमारे (वय ३५ वर्षे) , शंकर चंदर वाघमारे,( वय १८ वर्षे ५ महिने) यांना सापळा लावून, शिताफीने अटक केली होती. सदर गुन्हयातील इतर ३ आरोपींचा शोध सुरू असताना या गुन्ह्यातील सराईत आरोपी अजय वाघे (२४ रा. महड) हा पनवेल तालुका हद्दीत लपला असल्याची खबर या पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर यापूर्वी सुद्धा खालापूर परिसरात केलेले गुन्हे दाखल आहेत. याच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पनवेल तालुका पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.




