पेण शहराला वाहतूक कोंडीचा विळखा !
पोलिस प्रशासनाची होतेय दमछाक !
पेण शहरातील वाहतूक नियोजनाकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ?

अरविंद गुरव, पेण
रायगड जिल्ह्यातील वाढत्या शहरी करणामुळे जिल्ह्यातील लोकसंख्या कमालीची वाढत आहे. मुंबई आणि नवी मुंबईचा वाढता विस्तार हा आता जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पेणपर्यंत येऊन ठेपला आहे. पेण शहराचा विकास अजुन हवेतसा झाला नसला तरी मुंबई आता हाकेच्या अंतरावर असल्याने लोकसंख्या मात्र कमालीची वाढली आहे. त्यामुळे पेण शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून नागरी समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पेण शहरातील प्रमुख समस्या वाहतूक कोंडी असून या समस्येकडे वारंवार नागरिकांनी लक्षवेधी दिल्या असताना देखील नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. मात्र शहरातील वाहतूक कोंडी सोडवतांना पोलिस प्रशासनाची मात्र कमालीची दमछाक होत आहे.
पेण नगरपालिकेकडून वाहतूक नियोजनाचा कोणताही प्रस्ताव न केल्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आणि वाहन चालकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुतर्फा बेशिस्त, नियमबाह्य पार्किंग केली जात असल्याने शहरात वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडवण्याची मानसिकता प्रशासनातील अधिकाऱ्यांची नसल्याने आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकण्याची सवय अधिकाऱ्यांना लागली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

पेण शहराच्या बाजार पेठेमध्ये सण आणि उत्सवा करता लागणारे विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठ ग्राहकांनी फुलून जाते. ज्यावेळी बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी निर्माण होते त्यावेळी वाहतुकीची समस्या अधिक होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी इत्यादी सणांच्या वेळेला बाजारपेठेमध्ये विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या वाढते. अरुंद रस्त्यामध्ये दुचाकी पार्किंग, फळ आणि भाजी विक्रेते तसेच प्रमुख रस्त्यांवर दुतर्फा पार्किंग केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत पेण नगरपालिका प्रशासनाकडे सामाजिक संस्था व नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणे कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पेणकरांकडून केला जात आहे. शहरामध्ये महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, यांसह विविध विभागामध्ये कायमस्वरूपी रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक समस्येमध्ये वाढ होत आहे. त्यातच पेण नगरपरिषदेने ऐन सण-उत्सव काळात पेणमधील चांगल्या अवस्थेत असलेल्या आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांचे काँक्रिटिकरणाचा घाट घाटल्यामुळे वाहतूक कोंडित कमालीची वाढ झाली आहे.
पेण शहरामध्ये प्रतिदिन वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढतच आहे. शहराची व्याप्ती पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांची गरज आहे. परंतु एवढ्या मोठ्या पेण शहरामध्ये वाहतूक व्यवस्था नियोजन करण्यासाठी केवळ चार ते पाच पोलीस कार्यरत आहेत. चावड़ी नाका ते अगदी पेणच्या मुख्य प्रवेशद्वारा पर्यंत रस्त्याच्या दुतर्फ वाहन बेकायदेशीर रित्या उभी केली असतात. तसेच मोरेश्वर थेटर येथे रस्त्याच्या दोन्हींबाजुला कांदा, बटाटे विक्रेता, फळ विक्रेता यांनी दुकानें थाटली आहेत. तसेच एसटी स्टँड जवळ असलेल्या दोन्ही वाइन शॉप जवळ माद्यप्रेमी रस्त्यावर मध्यभागी वाहन लावून मद्य खरेदी करत असतात. सकाळी आणि सायंकाळी कंपनीच्या कामगारांना घेऊन येणाऱ्या बसेस याही कामगारांच्या चढ-उतार करण्यासाठी रस्त्यावर थांबवल्या जातात यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने विद्यार्थी, महिला आणि आबाल वृद्धांची गैरसोय होते.
अवैद्य बाधकामांकड़े पालिकेचे दुर्लक्ष; वाहतूक कोंडीला मिळतेय बळ !
पेण शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी पत्र्याच्या शेड टाकून त्या भाड्याने देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या शेडचा वापर बहुसंख्य परप्रांतीय व्यापारी करीत आहेत. अवैद्यरित्या उभ्या केलेल्या या व्यापाराकड़े पेण नगरपालिका दुर्लक्ष का करत आहे ? हा प्रश्न नागरिक विचार आहेत. या अवैद्य दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी जाणार ग्राहक आपले वाहन रस्त्यावर उभे करून वाहतूक कोंडीला प्रोत्साहन देतांना दिसत आहे. त्यामुळे या पत्र्यांच्या शेडमधील दुकानामुळे वाहतूक कोंडिला अधिक बळ मिळत आहे.
पेणमध्ये पे अँड पार्क ची आवश्यकता
पेण शहराची भौगोलीक रचना पाहता पेण हे तालुक्यांचे महत्वाचे ठिकाण आणि रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे पेण येथे तालुक्यातूनच नाही तर जिल्ह्यातून नागरिक येत असतात. येतांना सोबत आपले वाहन घेऊन येतात. मात्र पेण नगरपरिषदेकडून या आधिही वाहनतळाची कोणतीही सोय केली नव्हती आणि ती आजही नाही. त्यामुळे शहरांमध्ये वाहतूक नियोजन कागदावरच राहिले आहे. या ठिकाणी वाहने पार्क करण्या संदर्भात आणि बेजबाबदारपणे पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करणारे कोणतेच पथक कार्यरत नसल्याने हा बेजबाबदारपणा वाढतच चालला आहे. पेण शहराच्या जवळ असणाऱ्या कंपन्याच्या बसेसला सण आणि उत्सवाच्या काळात पेण शहरात येण्यास बंदी असते त्यांच्यासाठी वेगळा मार्ग आखुन दिलेला असतो. मात्र प्रशासनाच्या आवाहनाला या कंपन्या केराची टोपली दाखवतात. पेण पोलिस प्रशासनाने एक दिशा मार्गाची व्यवस्था केली असतांना हि येथील बेशिस्त वाहन चालक पोलिस प्रशासनाला जुमानत नाहीत. पेणकरांकडून बरेच दिवसांपासून पे अँड पार्कची वाहनतळाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.
भाजी विक्रेते, कांदे बटाटे, फळ विक्रेते आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असताना दिसत आहेत. परंतु त्यांचे व्यावसाय हे अरुंद रस्त्यावर थातलेले आहेत. या व्यावसाईकांना अन्य ठिकाणी योग्य ती जागा देणे प्रशासनाने बंधनकारक आहे. नगरपालिका प्रशासनाने लवकरच रस्त्याच्या दुतर्फा लाईन आऊट करून त्या लाईन वर आणि लाईनच्या बाहेर जे व्यवसायिक हातगाड्या अन्य व्यवसाय करीत आहेत. यांना काही दंडात्मक आर्थिक कायद्यामध्ये तरतूद करून नियम करणे गरजेचे आहे. नगरपालिका प्रशासन त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन यांनी याबाबतीत योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. जनसेवा सामाजिक विकास संस्था संघटनेच्या माध्यमातून लवकरच नगरपालिका प्रशासन त्याचबरोबर पोलिस प्रशासन यांना याबाबतीमध्ये निवेदन देणार आहे. – बंडू खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते
पेण शहरामध्ये वाहनतळासाठी नगरपालिका प्रशासन जागा शोधत आहे. एसटी स्टॅंड समोरील विक्रम आणि टॅक्सी जेथे उभ्या राहतात ती जागा शहरातील आणि बाहेरील वाहनांच्या वाहनतळासाठी आरक्षित आहे. मात्र विक्रम आणि टॅक्सी चालकांनी या जागेवर त्यांचे वाहनतळ बनविले आहे. लवकरच पर्यायी जागेचा शोध प्रशासन घेत आहे. जेणे करून तेथे वाहनतळ सुरु होऊन पेणमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. – जीवन पाटील. मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद
