पेण तालुक्याला अमली पदार्थांचा विळखा!
सुमारे दीड किलो गांजासह एका महिला आरोपीला अटक; ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
अरविंद गुरव, पेण
मागील काही महिन्यांपासुन पेणमध्ये अमली पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याची कुजबुज पेणमध्ये सुरु आहे. शेकडो तरुण या अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. रात्री पेण शहराच्या काही चौकामध्ये काही तरुण रात्र जागवताना दिसत आहेत.
गुप्त सूत्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री मोठी कारवाई करत पोलिसांनी १.२९८ किलो गांजासह एका ३८ वर्षीय महिला अंजली यादव हिला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ३०,००० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या पूर्वीही पेणमध्ये पोलीस पथकाकडून गांजा सारख्या मादक व नशाकारक अमली पदार्थांची विक्री व बाळगताना मोठी कारवाई करण्यात आली होती. यामुळे पेण शहरासह तालुक्यात अंमली पदार्थ विक्रीचे जाळे जलद गतीने पसरत असल्याचे दिसून येत आहे. तर यामध्ये पुरुषांबरोबरच आता मोठ्या प्रमाणात महिला व नवतरुण मुली विक्री व अंमली पदार्थांच्या सेवनाकडे ओढल्या जात असल्याची चर्चा पेणमध्ये सुरू झाली आहे.
अमली पदार्थांमुळे निष्पाप महिला, मुलींच्या बाबतीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगडाच्या महिला पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांमधून दबक्या आवाजात होत आहे.
या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात २९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश रजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुढील तपास करण्यात येत आहे.
पेण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पेण पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

