आता युनेस्कोच्या नामंकानासाठी महाराजांचे ११ किल्ले !
नामंकानाच्या जनजागृतीसाठी सह्याद्री प्रतिष्ठानची सह्यांची मोहीम

प्रतिनिधि, पेण
रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड आणि खांदेरी यांसह महाराष्ट्रातील एकूण 11 किल्ले आणि तामिळनाडू येथील एक किल्ला असे एकुण 12 किल्ले युनेस्कोने नामांकनासाठी निवडले आहेत आणि त्याचा आढावा घेण्यासाठी युनेस्कोची टीम येत्या 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान येऊन आढावा घेऊन जाणार आहे, त्यामुळे आपल्या या 12 किल्ल्यांचे जास्तीत जास्त संवर्धन व्हावे, तेथे कोणीही वाईट कृत्य किंवा अस्वच्छता करु नये याच्या जनजागृतीसाठी आज सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे पेण शाखेच्या वतीने पेणच्या नाक्यावर ” चला होऊ जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार ” या ब्रीदवाक्क्यातुन नामंकनाच्या समर्थनार्थ सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली साह्यांची मोहीम राबविली.
यावेळी समीर म्हात्रे यांनी सांगितले की, नामांकनाच्या माध्यमातून आपला इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी सर्व दुर्गासेवक, शिवप्रेमी, ट्रेकर्स, सामजिक संस्था यांनी जनजागृती म्हणुन आमच्या या उपक्रमा प्रमाणेच विवीध प्रकारचे उपक्रम राबऊन आपल्या या गडकिल्ल्यांना नामांकन कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत युनेस्कोची टीम या किल्ल्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या देशात येत आहे, त्यामुळे आपल्या गडकिल्ल्यांवर प्लास्टिक, प्लॅस्टिकच्या बाटल्या, ईतर कचरा आदी गोष्टीं कायमस्वरूपी टाळा आणि आपल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करा. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण विभाग अध्यक्ष साईराज कदम, रोशन टेमघरे, रोहित केणी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पेणकरांनी या मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला.



