लोकल

इरले-घोंगडी ची जागा घेतली प्लास्टिक ने !

– रायगड

पावसाळा सुरू झाला की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. शेती व्यवसायातील सामानाची जुळवाजुळव करण्यात शेतकरी सध्या व्यस्त असून पेरणी, लावणीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक साहित्यांपैकी इरले-घोंगडी यांनाही तितकेच महत्त्व आहे. याचा उपयोग प्रामुख्याने शेतकरी पावसात भातशेतीचे काम करत असताना भिजू नये म्हणून आणि शरीराला ऊब मिळण्यासाठी इरले-घोंगडी पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात वापरतात. याचा वापर प्रामुख्याने आदिवासी शेतकरी जास्त करीत असतात; परंतु सध्या आधुनिक युगात रेनकोटचा आणि पांघरता येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर वाढतो आहे. मेहनत करून वस्तू तयार करण्यापेक्षा तयार वस्तू बाजारात मिळत असल्याने इरले-घोंगडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

पावसाळ्यात पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी लोक पळसाची पाने, बांबू आणि अंबाडीचे सूत (दोरा) काढून इरले-घोंगडी बनविण्याचे काम करताना दिसतात. यातून आदिवासींना पैसेही मिळतात; परंतु जसा काळ बदलत चाललेला आहे, तशा प्रकारच्या रूढी, परंपरा व व्यवसाय, साधनेदेखील बदलत जाऊन त्याची जागा अत्याधुनिक साधनांनी घेतली आहे. शेतीमधून बैल, नांगर हद्दपार होऊन त्याची जागा ट्रॅक्टरने व टीलरने घेतली आहे. तसेच इरले-घोंगडी बनविण्याचा व्यवसायही बदलत्या काळानुसार संपुष्टात येत आहे.

पूर्वी पावसाळा सुरू झाला की, शेतकरी इरले-घोंगडी बनवीणाऱ्या व्यावसायिकांना आर्डर द्यायचे; पण आज या इरले-घोंंगडीचा विसर खुद्द शेतकऱ्यांनाच पडला आहे. रेनकोट, गमबूट, प्लॅस्टिक टोप्या, मेनकापड यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु इरले-घोंगडी बनविणाऱ्याकडे कुणीही फिरकलेले नाही. ५०० ते १००० रुपयांत मिळणाऱ्या प्लॅस्टिकचा कोट पावसापासून जरी बचाव करीत असला तरी इरले-घोंगडीप्रमाणे थंडीपासून बचाव करणारा नाही, शरीराला ऊब देणारा नाही. पण हे लक्षात घेतो कोण? हेच इरले अवघ्या ३०० ते ४०० रुपयांत तर घोंगडी ५०० ते ६०० रुपयांपर्यंत मिळत असे. इरले-घोंगडी हे पाच ते सहा वर्षांपर्यंत वापरता येते; परंतु सध्या इरले-घोंगडीचा वापर खूप कमी झाल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या इरले-घोंगडीची जागा आता रेनकोट, प्लॅस्टिक, प्लॅस्टिक टोप्या, मेनकापड यांनी घेतल्यामुळे इरले-घोंगडी बनविण्याच्या पारंपरिक व्यवसायावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पावसाळा सुरू झाला की बाजारात रेनकोट, मेनकापड, प्लॅस्टिक उपलब्ध होते. इरले-घोंगडी तयार करण्याचे साहित्य मिळत नसल्यामुळेही आदिवासी समाजातील कामगारांना मजुरी करून अन्य काम करून पोट भरावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!