कावीळ आजरावरील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर काळाच्या पडद्याआड !
राजाराम दत्तात्रेय गुरव यांचे वृद्धापकाळाने निधन.
अरविंद गुरव, पेण
पेण तालुक्यातील गुरव आळी येथे राहणारे राजाराम दत्तात्रेय गुरवयांचे आज पहाटे १ वाजून ३० मिनिटांनी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.
काही माणसे आपल्या कार्याने समाजाच्या आणि जन-माणसांच्या अखंड स्मरणात राहतात. त्यातीलच एक नाव म्हणजे राजाराम गुरव (राजाआण्णा). राजाआण्णा यांची ओळख म्हणजे कावीळ सारख्या जीवघेण्या आजरावर अत्यंत माफक दरात खात्रीशीर उपचार करणारे आयुर्वेदिक डॉक्टर. गेली अनेक दशके पेण तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांवर त्यांनी खात्रीशीर उपचार करुन रोगराहीत केले आहे. त्यांच्याकडे रायगड जिल्ह्यातूनच नाही तर मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतूनही कावीळ या आजराचे रुग्ण येत. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी ते विशेष सेवा देत. कधी कोणावर विनामूल्य उपचार करत तर कधी फक्त एक नारळ घेऊन त्यांची सेवा करीत. आयुष्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत त्यांनी ही सेवा अविरतपणे सुरु ठेवली होती.
गणेश मूर्ती कलेत त्यांचा विशेष हारखंडा होता. गणेश मूर्ती बनविण्याचा त्यांचा स्वतः चा कारखाना देखील आहे. स्पष्टवक्ता आणि रोखठोक व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण जिल्ह्यात होती. राजाराम गुरव (राजाआण्णा)यांच्या निधनाने गुरव समाज तसेच पेण तालुक्यात विशेष आदिवासी बांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गुरव समाजाचे अध्यक्ष बंडू खंडागळे आणि गुरव आळी सार्वजनिक उत्सव मंडळ पेण यांच्या तर्फे राजाराम गुरव (राजाआण्णा) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



