पेण खारेपाट विभागातील ग्रामस्थ धडकले हेटवणे धरणावर !
संतप्त नागरिकांचा धरणाच्या कालव्याच्या पाण्यात उतरून आंदोलन.
प्रतिनिधि, पेण
गेली अनेक दशके उलटून गेली तरी पेण तालुक्यातील खारेपाट भागतील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नाही. अनेक आंदोलने, उपोषणे झाली तरी आजतागायत या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अखेर आज ग्रामस्थांनी थेट हेटवणे धरणावर जाऊन कालव्यामधील पाण्यात उतरून जल आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थ नंदा म्हात्रे यांनी या धरणाच्या पाण्यावर सर्वप्रथम आमचा हक्क असून तो हक्क मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे जाहीर केले.
नवी मुंबईला हेटवणे धरणाचे जाणारे पाणी रद्द करावे, जल बोगद्याचा मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा, लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावेत आदी मागण्या घेऊन या ग्रामस्थांनी आज हेटवणे धरणावर जल आंदोलन केले. यावेळी खारेपाट विभागातील आंदोलनकर्त्या नंदा म्हात्रे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, हेमंत पाटील, सी आर म्हात्रे, राजन झेमसे, राजेंद्र म्हात्रे, बळीराम भोईर, जितू ठाकूर, अभिमन्यू म्हात्रे, प्रसाद पाटील, महेंद्र ठाकुर, अजित पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पेणच्या खारेपाट भागासाठी ७६७ कोटी रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत, मात्र आज चार महिने झाले तरी कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत. आता मार्च अखेर नंतर जरी हा कार्यारंभ आदेश आला तरी पावसाळा येईपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे यावर्षी सुद्धा आमच्या खारेपाट भागाला पिण्याचे पाणी मिळणे कठीण आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार येथील लोकप्रतिनिधी आहेत याची आम्हाला लाज वाटते. मात्र आज आम्ही प्रशासनाला नोटीस देऊन या हेटवणे धरणावर जल आंदोलन केले असले तरी यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही येथे येऊन जलसमाधी घेऊ अशा प्रकारचे सडेतोड उत्तर खारेपाट विभागातील ग्रामस्थ नंदा म्हात्रे यांनी दिला आहे.
सदर प्रकल्पाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासन स्तरावर प्रस्ताव देखील पाठवला आहे. कामाची मंजुरी मिळाल्यानंतर कालव्याचे काम सुरू होईल. – आर एस कापाले, सहाय्यक अभियंता श्रेणी-१
शेती सिंचन प्रकल्पाबाबत जो सेवा हमी कायदा आहे त्यात ज्या अधिकाऱ्यांनी दप्तर दिरंगाई केली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत आम्हाला पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी मिळत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील. – प्रकाश माळी, अध्यक्ष – खारेपाट विभाग संकल्प विकास संघटना
Sent from Yahoo Mail on Android

