निराधार बालकांसोबत धुळवड साजरी !
राजमुद्रा न्यूज नेटवर्क, पालघर
सणांकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा असतो. कोणाला सणांच्या साजरीकरणात स्वारस्य असतं, कोणी सणांचे संदर्भ आणि त्यातील रुपकं शोधून आपली अभ्यासाची भूक भागवतात, कोणी या निमित्ताने संस्कृतीशी नाळ जोडून ठेवू पाहतात, कोणी सणांद्वारे निसर्गाचा संदर्भ देऊन तो आचरणात आणून सामाजिक भान जपतात तर कोणी त्रयस्थपणे सणांचे उपचार पार पाडून अलिप्तता जपतात. प्रत्येकाची विचारांची पद्धत निराळी आणि साजरीकरणाचे मार्ग निराळे. पण आजही अशा काही संस्था, संघटना आणि सामाजिक सेवा जपणारी मंडळी आहेत जी निसर्ग आणि त्याची निर्मितीची सांगड घालून आपले सण साजरे करीत आहेत.

त्यातील एक “कोकण कट्टा”. आज धुळवडीचा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकण कट्टा या सामाजिक संस्थे तर्फे आज पालघर जिल्ह्यातील भाताणे या गावी स्थित विशाल परुळेकर यांच्या “साई आधार” या संस्थेच्या ४२ निराधार मुलांसोबत धुळवड साजरी केली. यावेळी “कोकण कट्टा” तर्फे येथील मुलांना पिचकारी आणि नैसर्गिक रंगांचे वाटप करून वाद्य आणि गाण्यांचतालावर ठेका धरून धूळवड साजरी केली. दुपारच्या जेवनानंतर धुळवड सणाची सांगता झाली. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुन पुढील वर्षी याच ठिकाणी धुळवड साजरी करण्याचा निर्धार कोकण कट्टा संस्थापक अध्यक्ष अजित पितळे आणि सदस्यांकडून करण्यात आला. यावेळी जयेश बंदरकर आणि विनायक जाधव यांचे मोलाचे सहकार्य या उत्सवावेळी मिळाले.

यावेळी कोकण कट्टाचे अध्यक्ष अजित पितळे, विवेक वैध, जयेश बंदरकर, अजित पितळे, विनायक जाधव, सुजीत कदम, निशी मोरे, अनंत कारेकर, सुहास देसाई आणि मित्र परिवार उपस्थित होते.


