पेण तालुक्यातील आदिवासी वाड्या अजूनही नॉट रेचबल.
चांगल्या रस्त्या अभावि आदिवासी नागरिकांचे हाल.

अरविंद गुरव, पेण
युती सरकार राज्यात कोट्यवधींचे रस्त्यांचे जाळे गाव, खेड़े-पाडे- वाड्यांना जोड़त आहे अशा वल्गना करीत आहे. मात्र परिस्थिति काही वेगळीच आहे. पेण तालुक्यातील अनेक असदिवासी वाड्या अजूनही चांगल्या रस्त्यापासुन वंचित आहेत. खड्डेमय रस्त्या वरुन नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करीत असल्याचे चित्र सध्या पेण तालुक्यात आहे.
पेण तालुक्यातील वाक्रुळ ग्रामपंचायत हद्दीतील मख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झालेला रस्ता रामा ८८ ते फणसवाडी रस्ता आणि नाडे, आघाई ते भोगेश्वर रस्त्याचे सिमेंट काँक्रेटिकरण आणि रुंदीकरनासाठी दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी कामाचा कार्यारंभ आदेश निघाला होता मात्र ५ महिने उलटूनही कोणत्याही प्रकारचे काम या रस्त्याचे संबंधित ठेकेदाराने सुरु केले नसल्याने आणि १२ किलोमीटरचा मार्ग ठेकेदाराणे विनाकारण खोदून ठेवला असल्याने येथील नागरिकांना खड्डेमय रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या रस्त्यामुळे राजमाल (नाईकवाडी), म्हेसकोंड (पानेड), जांभळ्याची वाडी, खरबाची वाडी, नाडे, निंबारवाडी, फणसवाडी, राजमाती, काटीचिवाडी आणि भोगेश्वर आदी ११ आदिवासी आणि अन्य समाजाची लोकवस्ती असलेली गावे आणि सुमारे ३ हजार लोकसंख्या या रस्त्यामुळे पेण शहराला जोडले जातात. मात्र ठेकेदार आणि बाधकाम विभागाच्या अनास्थेमुळे हा रस्ता खड्डयात हरवला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत आणि ठेकेदाराणे रस्ता खोदून ठेवला असल्याने येथील आदिवासी नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराने लवकर या रस्त्याचे काम सुरु करावें अन्यथा येणाऱ्या काही दिवसात आंदोलन करण्याच्या तयारीत येथील आदिवासी नागरिक आहेत.




