कोकण कट्टा आणि ग्राम संवर्धनकडून आदिवासी भगिनींना भाऊबीज भेट !
प्रतिनिधि, पेण
दिवाळी हा नव चैतन्य निर्माण करण्याचा, प्रकाशाची उधळण करित गोडधोड फराळ खाऊन आनंद साजरा करण्याचा सण आहे. या आनंदाच्या सणामध्ये आदिवासी भगिनींची सुद्धा दिवाळी तितकीच आनंददायी व्हावी यासाठी विलेपार्ले येथील सामाजिक संस्था कोकण कट्टा आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी (पनवेल) ह्या दोन्हीं सामाजिक संस्था मागील चार वर्षांपासून एकत्र येत आदिवासी वाड्या-पाड्यांमध्ये जाऊन आदिवासी भगिनींकडून ओवाळणी करून घेत त्यांना साडी-चोळी आणि दिवाळी चे फराळ भेट देवून भाऊबीज साजरी करतात.

यावर्षीही भाऊबिजेच्या निमित्ताने पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुश्मि- खारपाडा हद्दीतील स्वयंभू शिव मंदिर ठाकूरपाडा येथे कोकण कट्टा आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भगिनींसाठी साडी-चोळी व फराळ भेट देण्यात आले. गेली चार वर्ष सातत्याने हा स्तुत्य उपक्रम या दोन्ही संस्था राबवित असून सदर कार्यक्रमात २५० भगिनींना भाऊबिज भेट देण्यात आली. यावेळी कोकण कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, सुनील वनकुद्रे, जगन्नाथ गावडे, सुजित कदम, हेमंत सावंत,विजय खोपे, चेतन जळगावकर, प्रथमेश पवार, विजय बाईत, दत्ता सोनपावले, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते राजू पाटील, मानसीताई पाटील, सचिन पाटील,स्मिता रसाळ, शैलेश कोंडसकर, प्रा.जयेश शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



