चाकोरीबद्द ज्ञान मिळवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी करिअरसह सर्वांगीण ज्ञान मिळवणे काळाची गरज – सामजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर
विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात विद्यार्थांना केले आवाहन

पेण – राजेश प्रधान
संगणकीय क्रांती नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चा जमाना आला आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञान व प्रगतीची कास धरून गगन भरारी घ्यावी. जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे. त्याप्रमाणे शिक्षणामध्ये सुद्धा ऑनलाईन क्लासेस व वर्चुअल क्लासेस सारखे बदल झाले आहेत. या बदलांचा व इंटरनेटचा सकारात्मक फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून राज्याचे व देशाचे नाव लौकिक करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर यांनी पेण येथे बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात केले.
नवीन शिक्षण पद्धतीमुळे व शिक्षणामध्ये झालेल्या अमुलाग्र बदलामुळे विद्यार्थ्यांचे बौद्धिक क्षमता वाढली आहे, त्याचप्रमाणे स्पर्धा ही वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी पालकांनी प्रवृत्त करायला पाहिजे. ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता पालकांनी सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. भविष्यात होणाऱ्या बदलांचा अंदाज घेऊनच विद्यार्थ्यांनी आपलं करिअर निवडावे. विद्यार्थ्यांना कठोर संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी सजक राहून आयुष्याचा पाया घट्ट करावा. आपलं करिअर घडवण्याकरिता सर्वांचे मार्गदर्शन घेऊन भविष्य घडवावे.

फक्त ठराविक चाकोरीबद्द ज्ञान मिळवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी करिअर सह सर्वांगीण ज्ञान मिळवणे काळाची गरज आहे. आपली बौद्धिक क्षमता पाहूनच पुढील ध्येय धोरणे ठरवावी. आजच्या काळात अनेक करिअर ऑप्शन असून वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करण्याची संधी आज विद्यार्थ्यांना पुढे आहे. या संधींचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. करियर घडविताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे अडचण आल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहू त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन प्रसाद भोईर यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड, पीआरपी जिल्हाध्यक्ष सिताराम कांबळे, यशवंत वाशिकर, एम.डी.कांबळे, दिपक सोनावणे, भास्कर पाटील, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष नागेश सुर्वे, शहर अध्यक्ष समिर घायतले, को.बौ.महासभेचे राम गायकवाड, महिला आघाडी सुवर्णा सोनावणे, अरुणा घायतले, प्रभाकर घायतले आदिंसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


