महिलांचा पाय श्वापदांच्या जबड्यात!

राजमुद्रा विशेष लेख – कांतीलाल कडु (संपादक – निर्भीड लेख)
घराबाहेर पडणाऱ्या महिला असुरक्षित आहेत, हे दर्शविणाऱ्या लाखो घटना महाराष्ट्रात घडत आहेत. पूर्वी नोकरीला जाणाऱ्या महिला, मुख्यत: तरुण वर्गातील स्त्रियांचा उंबरठा ओलांडणारा पाय किती वेदनादायी ठणकत होता, याची अनेक उदाहरणे उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राने पाहिली. ते लोण हळूहळू ग्रामीण भागाकडे वळले. त्याची पुनरावृत्ती काल उरणमध्ये घडली आणि जनतेच्या मनात खदखदणाऱ्या लाव्हारसाचा उद्रेक सतत दोन दिवस होत आहे. एका अर्थाने समाजातील लोप पावत चाललेली जागरूकता पुन्हा उसळी घेत असल्याचे दिसले.
उरण शहरात एका तरुणीचा भोसकून खून करण्यात आला. तिच्या शरीरावर चाकूने निर्दयीपणे वार करण्यात आले. तिला कंठस्नान घालताना क्रूरतेची परिसिमा गाठली गेली. यात उरण पोलिसांनी थोडी हलगर्जी केलीच. 25 तारखेला तरुणी बेपत्ता होती . मुलगी सायंकाळपर्यंत घरी परतली नसल्याने स्वाभाविकपणे जन्मदात्यांच्या हृदयाचा ठोका चुकला असेल. मनाची घालमेल झाली असेल. घरातील शांतता भंग पावली असेल. भीतीने काळजाला छिद्र पडली असतील. ‘काय झाले असेल, माझ्या मुलीचं’. त्यात विविध वाहिन्यांतील मालिकांमधील भयरसाने ग्रासलेली दृश्यही डोळ्यासमोर उभी राहिली असतील. नको, नको त्या विचारांचे काहूर माजले असेल. … आणि त्याच भयावह परिस्थितीत तिच्या आई वडिलांनी थरथरत्या पायांनी उरण पोलिसांचा उंबरठा ओलांडला. गुन्ह्याला पूर्व पार्श्वभूमी असतानाही पोलिसांनी फार गांभीर्याने न घेता, भारतीय न्यास संहितेप्रमाणे (नवीन कायाद्याच्या अनुषंगाने) मिसिंग (बेपत्ता) नोंद करून आई वडिलांना, ‘तुम्हीही तपास करा, आम्हीही पाहतो’, असे सरकारी पोलिस खाक्याच्या ठेवणीतील (बेजबाबदारपणाचे) उत्तर दिले आणि तक्रारदारांना आल्या पावली परत जाण्यास सांगितले. ड्युटीवरच्या पोलिसांनी, नेहमीच येतात अशा तक्रारी आणि घडतात प्रेमप्रकरणे, मुली पळून जातात आणि दोन तीन दिवसात त्यांचा फोन येतो घरी, अशा पूर्व अनुभवाच्या कौशल्याने दुर्लक्ष केले. दुर्लक्ष, हलगर्जी, कसूरता केली. ती आज त्यांच्यावर शेकणार आहे.
दुसऱ्यांच दिवशीचा सूर्य उगवला तो मुळात त्या मुलीच्या हत्येच्या घटनेची बातमी घेवून. तिला चाकूने आमनुषपणे संपवून टाकल्याचे वाऱ्यासारखे वृत्त सोशल मीडियावरून पसरले. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. याची जाणीव अनेकांना नसते. उरणकरांनी त्याबाबतीतही संयम पाळला. पण त्यांचा आक्रोश, मनातील धग तिळमात्र कमी होवू दिली नाही.
आज त्यांनी एकत्र येवून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. आंदोलन, मोर्चा, उपोषण ही संविधानाची शस्त्र तर आहेतच. परंतु, शहर जिवंत असण्याचे ते मोठे एक शास्त्र आहे. जेव्हा एखाद्या अन्यायाविरोधात कुणी वज्रमूठ आवळत असेल तेव्हा ते त्याच्या संवेदनशीलतेसोबत जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. म्हणूनच उरणकरांनी आज जो मोर्चा काढला त्यांचे समर्थन करणे उचित ठरेल. त्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मानवी मनाला गोविंदांच्या सात थरांची कडक सलामी द्यावी लागेल. जेव्हा शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी गाढ निद्रेत असतात किंवा तसे जाणीवपूर्वक ढोंग करीत असतात तेव्हा समाजाच्या पेटलेल्या मनगटात सत्तेचा तख्त उलटून टाकण्याची ताकद स्फूरण पावत असते, म्हणूनही उरणकरांचे अभिनंदन करावे लागेल. त्यांच्यातील स्पिरिट कायम आहे, याचे कौतुक करावे लागेल.
उरण शहरात जी घटना घडली त्याचं दिवशी न्हावे येथेही अशीच माणुसकीला काळिमा फासणारी, कायद्याचे धिंडवडे काढणारी घटना घडली. दोन वर्षापूर्वी लग्नाची मागणी घातलेल्या तरुणीच्या कुटुंबाने लग्नास नकार दिल्याने, त्या विकृत तरुणाने वेळ, काळ साधून त्या तरुणीवर असाच मागून हल्ला चढविला. न्हावे गावाच्या एका टोकाला अरबी समुद्राच्या लाटा गर्जत असलेल्या मानकेच्या टोकावर ती तरुणी मैत्रिणीसोबत पाय मोकळे करायला बाहेर पडली असता या विकृत, गुंड प्रवृत्तीने हातातील लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर हल्ला चढविला.
न्हावा शेवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा नोंदवून आरोपीला तात्काळ अटक करण्याचे धाडस वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी केले. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी आहे. हॉस्पिटलचा वैद्यकीय अहवाल आला की, कदाचित आरोपी प्रीतम म्हात्रेविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद होवू शकतो. उरण पोलिसांकडूनही याच कारवाईची अपेक्षा उरणकरांना होती, आहे. कोपरखैरणे येथील एका विवाहितेवर झालेले बलात्कार आणि त्यानंतर हत्या या कृत्यामुळे समाज पेटून उठला आहे. तिथेही डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी भोंदू पुजारींना अटक केली आहे. उरण पोलिसांना मात्र, अद्याप सूर सापडला नाही. आरोपी महाराष्ट्राबाहेर पळून गेला आहे. त्यांचा कॉल रेकॉर्डवरून तपास सुरु आहे. पोलिसांना सुगावा लागला आहे, असे सांगण्यात येते. परंतु, गेल्या तीन महिन्यांपूर्वी जय घरत प्रकरणात उरण पोलिसांनी जो निगरगठ्ठपणा दाखविला, तो आज त्यांच्या अंगलट येत आहे. उरण पोलिस ठाणे गेल्या पाच वर्षात फारच बदनाम झाले आहे. सतिश गावंड प्रकरणात पोलिसांची गरिमा धुळीस मिळाली. दुप्पट पैसे देणाऱ्या योजनेत दोघा पोलिस अधिकाऱ्यांनीही बेहेशिबी गुंतवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आणि दोघांना बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर जय घरत अपघात प्रकरणात लोकप्रतिनिधी आणि आरोपीच्या वडिलांनी ‘मायाजाल’ फेकले. त्यामुळे जय घरत याला वाचविण्यात दोघा अधिकाऱ्यांची उचलबांगडी झाली. ते सध्या खाते निहाय चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांची अग्निपरीक्षा सुरु झाली आहे. मंगळावरपर्यंतची डेडलाईन त्यांना दिली आहे. मंगळवारपर्यंत त्यांना आरोपीला अटक करावेच लागेल, असा जनसमुदयाने रेटा लावला आहे. आज काढलेला मोर्चा शांतप्रिय ठरला असला तरी मंगळवारी अधिक आक्रोश होवू शकतो. याला अनेक कंगोरे आहेत. उरणची कायदा व सुव्यवस्था वेशीलाच टांगलेली आहे. सारडे येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यूही संशयास्पद असल्याचा अनेकांचा संशय आहे. पोलिसांनी त्याप्रकरणीही तपासात फार कष्ट उपासलेले दिसले नाहीत. परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे बंदर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल नेहूल यांनी आजचा आक्रोश शांत करण्यात बाजी मारली असली तर उद्याच्या बंडाचे फडकणारे निशाण त्यांनी लक्षात घेवून तपासाची पावले त्यादृष्टीने टाकली असतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.


