मंदिरात चोरी करणाऱ्या अट्टल चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या !
प्रतिनिधी, पेण
पेण शहरातील साई मंदिरासह वडखळ, दादर, रोहा व कोलाड येथील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या चोराच्या पेण पोलिसांनी मुसक्या आवळून त्याला गजाआड केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या साई मंदिरामध्ये चोरीची घटना घडली होती. या चोराने मंदिरातील दोन मोठ्या घंटा व समई चोरून नेली होती.
या चोरीचा तपास लावण्याकरिता पोलीस उपअधीक्षक गजानन टेम्पे व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी शहरातील १५ सीसीटीव्ही तपासून पाहिले. त्यात हा चोर चोरीचा ऐवज घेऊन पनवेलला जाणाऱ्या एसटी मध्ये जाताना दिसला. पोलिसांनी मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या चोरांचा रेकॉर्ड तपासला असता रेवदंडा पोलीस ठाण्यात महेश नंदकुमार चायनाखवा रा. थेरोंडा, आगळ्याची वाडी, रेवदंडा, ता.अलिबाग याचा रेकॉर्ड मिळाला. अशाच प्रकारच्या चोरी प्रकरणात महेश २१ मे रोजी जेलमधून शिक्षा भोगून आला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीतील फोटो बरोबर त्याचा चेहरा तपासून पाहिला असता महेश चोर असल्याची खात्री पटली.
पोलिसांनी महेश नंदकुमार चायनाखवाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पेण पोलिस ठाण्याकडे दाखल गुन्हाची कबुली दिली आहे. तसेच वडखळ, दादर, रोहा व कोलाड येथील मंदिरांमध्ये व पेण शहरातील ईतर वेगवेगळ्या मंदिरातून छोटी मोठी समई व घंटा चोरी केल्याचेही मान्य केले.

