पेण शिवसेनेच्या वतीने शाळांना सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन भेट
प्रतिनिधी, पेण
ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रीदवाक्य घेऊन नेहमीच विविध प्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पेण तालुका शिवसेनेच्या माध्यमातून आणि तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्या संकल्पनेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमटेम आणि शिहु येथील शाळांना ऑटोमॅटिक सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन भेट देण्यात आल्या. यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, तालुका प्रमुख समीर म्हात्रे, महानंदा तांडेल, दर्शना जवके, गजानन मोकल, दिपक पाटील, हिराजी चोगले, धन्वंती दाभाडे, ज्योत्स्ना शिंदे, जयराज तांडेल, नाजुका नाईक, निशांत पाटील आमटेम शाळेच्या सहशिक्षिका कविता मोकल, शीहू शाळेच्या संस्थेचे मंडळ अध्यक्ष डॉ.रोहिदास शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेच्या माध्यमातून यापूर्वी रावे येथे एका शाळेत तर वाशी येथे देखील दोन शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता. आज आमटेम आणि शिहु येथील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बोलताना समीर म्हात्रे यांनी इतर सामाजिक कार्य करत असताना विशेष करून वयात येणाऱ्या मुलींच्या आरोग्याचा विचार करून आम्ही हा उपक्रम राबवत असून खरं लाडकी बहीण योजनेवर जसं महिलांकडे लक्ष दिले जात आहे तसेच मुलांच्या आरोग्याचा विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणे गरजेचे आहे मात्र यातून राज्य शासनाची उदासीनता दिसून येत आहे. मात्र या मुलींची गरज लक्षात घेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील तेव्हा मात्र आम्ही राज्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याची उध्दव ठाकरे यांना विनंती करू असे सांगितले. तर जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी देखील अशा प्रकारचे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असून वयात येणाऱ्या मुलींमध्ये याचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे असे सांगून उपस्थित विद्यार्थिनींना आरोग्य विषयी कोणतीही शंका मनात आली तर संकुचित न होता आपले पालक किंवा शिक्षकांना हक्काने विचारा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे सांगितले.




