महेश बालदी यांना आगरी समाज “आगरी हिसका ” दाखविणार ! – राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील
महेश बालदी यांच्या वक्तव्याने दुखावल्या आगरी समाजाच्या भावना.
अरविंद गुरव, पेण
आगरी समाजातील महिला व मुलींबद्दल अपशब्द वापरणारे उरण मतदार संघातील उमेदवार महेश बालदी यांना या निवडणुकीत आगरी समाज आपला “आगरी हिसका” दाखविणार असल्याचा इशारा अखिल भारतीय आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी आज पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी अखिल भारतीय आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील, संघटनेचे खजिनदार पी.वाय.पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
“मी तुमच्याकडे मत मागायला येतो; मुली मागायला येत नाही” असे आगरी समाजातील महिला व मुलीं बद्दल अपशब्द वापरणारे उरण मतदार संघातील भाजपचे उमेदवार महेश बालदी यांची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर अनेक दिवस व्हायरल होतं आहे. त्याबद्दल त्यांनी आगरी समाजाची जाहीर माफी मागावी याबाबत ४ नोव्हेंबर ला बादली यांना पत्र देखील दिले होते. मात्र त्यांनी आज पर्यंत समाजाची माफी मागितली नाही. आमच्या आया बहिणी, मुली रस्त्यावर पडलेल्या नाहीत समाजातील महिलांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा देखील राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी यावेळी दिला.
तुम्ही आमच्या खाण्या-पिण्या वरून, आमच्या आगरी भाषेवरून हिनवत असाल तर आमचा आगरी समाज या निवडणुकीत तुम्हांला पायदळी तुडवल्या शिवाय राहणार नाही असेही म्ह्टले. समाजाला कमी लेखण्या बाबत तुम्ही माफी मागितली नाही तर तुम्हांला आगरी हिसका नक्कीच दाखवतील. आगरी समाजातील काही लोक स्वतः च्या फायद्यासाठी अशा उमेदवारांच्या पाठीशी आहेत. अशा लोकांना माझं आवाहन आहे की स्वतः च्या फायद्यासाठी लाचारी पत्करू नये. असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचे आवाहन देखील अखिल भारतीय आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी यावेळी केले.



