माझ्या प्रामाणिक प्रयत्नांचाच विजय होणार – अतुल म्हात्रे (मविआ उमेदवार)
अरविंद गुरव, पेण
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावत असताना शेवटच्या टप्प्यात पत्रकार परिषद घेऊन पेण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी मी या मतदार संघातील नागरिकांसाठी विकासाच्या बाबतीत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचाच विजय होणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या सोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोकल, महेंद्र ठाकूर, वैभव पाटील, सूर्यकांत पाटील आदि उपस्थित होते.
अतुल म्हात्रे यांनी या मतदार संघातील मूलभूत समस्यांचा विचार करून आणि त्यावर विशेष करून येत्या पाच वर्षांत टप्प्याटप्प्यात हे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. यामधे पेण खारेपाट भागतील पाणी प्रश्न येत्या सहा महिन्यांत सोडविणार,एमआयडीसी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना योग्य तो दर मिळऊन देण्यासाठी आणि त्यांची होणारी पिळवणूक दुर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आणि तो प्रश्न देखील एका वर्षात सोडविण्यात येणार, सेझ बाधित जमीन जी आजही रिलायन्सच्या ताब्यात आहे त्या येत्या दीड ते दोन वर्षात पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात मिळऊन देणार, येथील स्थानिकांना त्यांच्या न्यायाहक्काचा जो रोजगार आहे तो मिळऊन देणार, स्थानिक समाजाला जो दुय्यम आणि दुर्बल स्थान दिल जात त्या भूमिपुत्रांना न्याय मिळऊन देणार, या मतदार संघात ज्या रोजगाराच्या योजनाच आखण्यात आल्या नाहीत अशा मतदार संघात मेडिकल, ऍग्रो सारखे टुरिझम उभारून येत्या साडेतीन वर्षात लाखोंच्या संख्येने रोजगार निर्मिती करणार, गणपती कारखानदारांसाठी त्यांना प्रोत्साहन देऊन क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अमलात आणणार, आदिवासी वाड्या वस्त्यांवर येत्या साडेतीन वर्षात एक हजार घरकुले उभारणार, बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांना पूर्णपणे समान न्याय मिळऊन देण्यासाठी कटिबध्द राहणार, मुंबई – गोवा महामार्गाच्या विशेष करून सर्व्हिस रोडच्या कामाबाबत विशेष लक्ष देणार यांसारखे या मतदार संघातील प्रश्न हाताळण्याचे काम येत्या पाच वर्षात करण्याची ग्वाही अतुल म्हात्रे यांनी देऊन माझ्या या प्रामाणिक प्रयत्नांचाच विजय होणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांचा आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना पाठिंबा

मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे समर्थकांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. समाजाला त्रास देणाऱ्याना पाडून बदला घ्यायची हीच वेळ आहे अशी रोखठोक भूमिका घेत त्यांनी आपला दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. ज्याप्रकारे लोकसभेच्या निवडणुकीला मी मराठा समाजाला सांगितले होते, ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. त्याप्रकारे आत्ताही मराठा आरक्षण मिळवीण्यासाठी प्रयत्न न करणाऱ्यांना संपूर्ण मराठा समाज धडा शिकवेल. मराठा हा बुद्धिजीवी समाज आहे. त्यांना काय करावे आणि काय न करावे हे ताबडतोब लक्षात येते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे. परंतु या निवडणुकीत मराठा समाजाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवण्याच्या तयारीत होते. परंतु त्यानंतर त्यांनी माघार घेतली. आता ते कोणाला पाठिंबा देतात? यावर उमेदवार निवडून येणार की नाही हे ठरणार आहे. मराठा समाज हा करेक्ट कार्यक्रम करतो.

पेण विधानसभेचे उमेदवार अतुल म्हात्रे हे उच्च शिक्षित असून त्यांनी लंडन मध्ये जाऊन आर्किटेक्ट पदवी मिळविली आहे. तसेच जनतेप्रति त्यांचे व्हिजन चांगले असून पेण-सुधागड-रोहा मतदार संघातील सर्व मराठा समाजाला मी अतुल म्हात्रे यांना निवडून आणण्यासाठी आवाहन करत आहे असे त्यांनी सांगितले.



