महायुती सरकार हे गतिशील सरकार असून आघाडी सरकार हे स्थगिती सरकार होते – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फडणवीस यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना दिली बगल !

अरविंद गुरव, पेण
आज पेणमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य अशी सभा पेण-सुधागड-रोहा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ पेण नगरपालिका मैदानावर आयोजित केली होती. या सभेला संबोधित करतांना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली मात्र पेण मतदार संघातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांना बगल देत बोलणे टाळले.
राज्यात सध्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार आहे. मात्र याआधी अडीच वर्ष आघाडीच सरकार होत ते सरकार स्थगिती सरकार होत. या स्थगिती सरकारने आमच्या युती सरकारने सुरु केलेल्या जनतेच्या कल्याणकारी योजनेला आणि कामांना स्थगिती दिली. पण आम्ही सत्तेत आल्यावर पुन्हा बंद पडलेल्या योजना आणि कामांना गती देण्याचे काम केल. म्हणून आमच महायुतीच सरकार हे गतीशील सरकार असून महाविकास आघाडीचे सरकार हे स्थगिती सरकार आहे. असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी मधील नेत्यांना आज पेण येथे आयोजित महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचार सभे वेळी लगावला.

यावेळी पुढे फडणवीस म्हणाले की, याच मैदानावर मी यापूर्वीही आलो होतो तेव्हा रविंद्र पाटील आणि धैर्यशील पाटील हे एकमेकांचे विरोधक होते. मात्र आता दोघेही एक झाल्याने पेणची ताकद दुपटीने वाढली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना आणल्या. यात लाडकी बहीण योजना आणली मात्र विरोधक ही योजना बंद करण्याचे षडयंत्र करतात त्यांना आमच्या बहिणी योग्य जागा दाखवतील, तर येथील प्रलंबित असणाऱ्या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्ताच्या प्रश्नाबाबत ही आचारसंहिता संपताच तात्काळ बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
पेणच्या जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपस्थित महायुती सरकारमधील उपस्थित नेते तसेच उपमुख्यमंत्र्यांनी बोलने टाळले. पेण तालुक्यात गेली १४ वर्षे निवडणुकीचा अतिशय महत्वाचा बनलेला मुद्दा म्हणजे पेण अर्बन बँक त्याच बरोबर १७ वर्ष राखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, तालुक्यातील तसेच शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शहरातील भूमिगत गटारे, भूमिगत विद्युत प्रकल्प, नोकर भारती, रिंग रोड, भाजी मार्केट, नाट्यगृह आणि बेरोजगारी यांसारख्या अनेक प्रश्नांच्या समस्येवर आज उपमुख्यमंत्री आणि उपस्थित नेत्यांनी बोलणे टाळल्याने उपस्थित जनतेचा भ्रमनिरास झाला.

या सभेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, उमेदवार रविंद्र पाटील, सतिश धारप, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलिमा पाटील, शिवसेना शिंदे गट प्रकाश देसाई, भाजप उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, पीआरपी जिल्हा अध्यक्ष सिताराम कांबळे, राजेश मपारा आदिंसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


