लाडक्या बहिणींची बँकेत तुफान गर्दी !

राजमुद्रा न्यूज नेटवर्क, पेण
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. हे पैसे काढण्यासाठी बँकेत महिलांची तुफान गर्दी झाल्याचे चित्र पेण शहरासह तालुक्यात आहे.
लाडकी बहिणीचे पैसे १४ ऑगस्ट रोजी बँकेत जमा झाल्याने तसेच १५ ऑगस्ट रोजी बँकांना सुट्टी असल्याने काल पासून हे पैसे काढण्यासाठी महिलांच्या बँकेच्या बाहेरपर्यंत रांगा लागल्या आहेत. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आणि रक्षा बंधनच्या आधीच ओवाळणी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. काही बहिणी आपल्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का ? याचीही चौकशी करताना दिसत होत्या. लाडक्या बहिण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील महिलांनी तहसिल कार्यालय, सेतू कार्यालय, अंगणवाडी, महिला व बाल विकास कार्यालय या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती.

शासनाने कागदपत्रांची अट शिथिल केल्यानंतर लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले. १५ ऑगस्ट पूर्वी अअर्ज दाखल केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे ३ हजार जमा होणार आहेत. ज्यांनी उशिरा अर्ज दाखल केलेत, अर्ज केले नाहीत, असे लाभार्थी व ज्यांनी अर्ज करूनही त्रुटी राहिल्या आहेत अशा लाभार्थ्यांचे पुन्हा अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होऊ लागल्याने, या योजनेला चुनावी जुमला गांभीर्याने न घेतलेल्या बहिणीची धावाधाव झाली आहे. तर ज्या महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झाली आहे, अशा महिला मात्र भलत्याच खुश झाल्या आहेत. येत्या काही दिवस लाभार्थी महिलांची गर्दी अशीच वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून काही बॅंकानी आजपासूनच याचे नियोजन करण्याचे सांगण्यात आले आहे.



