ढोल ताशाच्या गजरात, वाजत-गाजत भाजपच्या प्रितम पाटील यांनी स्वीकारला पेणच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार !
राजेश प्रधान, पेण
नवनिर्वाचित हॅट्रिक नगराध्यक्षा यांचे स्वागत पेण नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत करण्यात आले. पेण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार भाजपच्या प्रितम ललित पाटील यांनी बुधवार, ७ जानेवारी रोजी अधिकृतरीत्या स्वीकारला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत पत्र देत प्रितम पाटील यांना पदभार प्रदान केला.
पेण नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत आमदार रवीशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रितम पाटील यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी आम्ही पेणकर विकास आघाडीच्या उमेदवार रिया धारकर यांचा ५ हजार ८६१ मतांनी पराभव केला होता.
नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा पेण नगरपरिषद सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रितम पाटील यांचा जंगी सत्कार केला. पदभार स्वीकारल्यानंतर प्रितम पाटील यांनी सांगितले की, निवडणुकी दरम्यान जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात येतील. तसेच लवकरच पेणच्या नागरिकांकरिता नागरी समस्या मांडण्याकरिता हेल्पलाइन ची सुविधा करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
या सोहळ्यास आमदार रवीशेठ पाटील, भाजपा महिला युवा मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा चित्रलेखा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अनिकेत तटकरे, गटनेते अनिरुद्ध पाटील, युवानेते ललित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत, उद्योजक रशाद मुजावर, उद्योजक राजू पिचिका, माजी नगरसेवक जितेंद्र ठाकूर, सोमेर पेणकर, विकास पाटील, मुदस्सीर अखवारे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, मुख्यधिकारी जीवन पाटील, पेण नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांसह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे कार्यकर्ते आणि पेणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लवकरच शहरातील सर्व रस्ते व गटारे सुसज्ज करण्यात येतील. तसेच पेणकरांना पुढील ५० वर्ष पुरेल एवढे पाणी हटवणे धरणातून आरक्षित करून शहरांमध्ये फिल्टर द्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याकरिता राज्य शासनाकडून १६० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे लवकरच तो मंजूर होईल. – आमदार रवीशेठ पाटील




