शिवसेनेच्या दणक्याने अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पेण नगरपालिका प्रशासनाला जाग !
नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याचे दिले आश्वासन
राजेश प्रधान, पेण
अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पेण नगर परिषदेच्या प्रशासनाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दणका देत वठणीवर आणले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मागण्या मान्य करीत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
पेण नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात अशुध्द पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भुमिका घेत नवनियुक्त पेण शहर प्रमुख सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेवर धडक देऊन प्रशासनाला जाब विचारला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर शिवसेनेने धडक देऊन पाहणी केली. यावेळी जलशुध्दीकरण केंद्राची दुरावस्था झाल्याचे दिसून आले. येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जलशुध्दीकरण केंद्राचे दोन्हीही लोखंडी गेट चोरीला गेले आहेत. पाण्याच्या टाक्यांवर झाकणेही नाहीत. त्यामध्ये उंदीर, घुस, कुत्रे, मांजर व इतर प्राणी अथवा मनुष्य पडून दुर्घटना घडू शकते. केंद्राची इमारत अत्यंत धोकादायक झाली आहे. कधीही पडून जीवीत हानी होऊ शकते. जल शुध्दीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी सर्व यंत्रणा बंद स्थितीत आहे. केंद्रात एकही सुरक्षा रक्षक नाही. सि.सि.टीव्ही कॅमेरे बंद स्थितीत आहेत. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या वास्तवाकडे मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. तसेच नागरिकांना तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
शिवसेनेच्या सर्व मागण्या मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी मान्य करीत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पाची सफाई करून बंद पडलेली यंत्रसामुग्री दुरुस्त करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे मान्य केले. पाण्याच्या टाक्यांवर नवीन झाकणे लावण्यात येणार आहेत. शुद्धीकरण प्रकल्पाच्या दोन्ही बाजूस नवीन गेट व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे चार सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचे मान्य केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावंड, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडीचा जिल्हा संघटक दिपाश्री पोटफोडे, शहरप्रमुख सुहास पाटील, माजी शहरप्रमुख प्रदीप वर्तक, विधानसभा समन्वयक समिर म्हात्रे, वाहतूक सेनेचे दिलीप पाटील, बाळू पाटील, जीवन पाटील, योगेश पाटील, शिवाजी म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, नाम शिंदे, नामदेव पिंगलस्कर, असदअली आखवरे, विजय पाटील, कमलाकर मोकल, महिला आघाडीच्या मेघना चव्हाण, वैशाली समेळ, हिना कागझी, सुधाकर म्हात्रे, कांचन थळे, किर्तीकुमार कळस, राकेश पाटील, प्रीतम नार्वेकर, ललित सावंत, दिलीप बामणे, नशिकांत म्हात्रे, कमलाकर मोकल, नरेश भालेराव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

