ठळक बातम्याताज्या बातम्यासामाजिक

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा

प्रतिनिधी, पेण

१९९९ साली लडाख येथील कारगिल युद्धात आपल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानवर विजय मिळवून येथील पर्वतरांगांवर तिरंगा फडकवला हा दिवस म्हणजे कारगिल विजय दिवस समजून दरवर्षी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून पोलिस प्रशासन आणि माजी सैनिकांना सोबत घेऊन साजरा केला जातो. आज महात्मा गांधी वाचनालयाच्या सभागृहात देखील हा विजय दिवस पार पडण्यात आला. यावेळी माजी सैनिक जनार्दन म्हात्रे यांनी बोलताना सीमेवर युद्ध जिंकण्यासाठी सीमेसह देशांतर्गत एकजूट देखील तेवढीच महत्वाची असते असे सांगितले. यावेळी विजय दिवस साजरा करण्यासाठी महिला पोलिस अधिकारी शिल्पा वेंगुर्लेकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, तालुका अध्यक्ष साईराज कदम यांसह पोलिस कर्मचारी, माजी सैनिक, सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे आणि नागरिक उपस्थित होते.

कारगिल युद्ध सुरू असताना मी त्या युद्धाचा एक भाग म्हणून मला त्याठिकाणी उपस्थित रहायला मिळाले हे देशभक्त म्हणून मी माझे भाग्य समजतो असे माजी सैनिक जनार्दन म्हात्रे यांनी सांगून आम्ही देशासाठी लढत असताना फक्त सीमेवरच नाही तर त्यावेळची देशांतर्गत एकजूट ही आमच्यासाठी स्फूर्ती देणारी असते. त्यामुळे देशाच्या सीमेवर कोणतेही युद्ध सुरू असताना लहान मुलांपासून अगदी सर्वच स्तरातून सैनिकाला प्रोत्साहन देण्याचे काम नागरिकांनी करणे गरजेचे आहे असे सांगितले. तर पोलिस अधिकारी शिल्पा वेंगुर्लेकर यांनी देखील आम्ही पोलिस दलातील सराव चाचणी करत असताना सीमेवर सैनिक चोवीस तास डोळ्यात तेल घालून कसे सज्ज असतात हे पाहिले आहे, ते सीमेवर आहेत म्हणून देशांतर्गत नाकाबंदी करताना आमच्यावरील ताण कमी असतो असे सांगितले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी देखील सैनिकांप्रती बोलताना आपल्या जवानांनी कारगिल युद्धात जे शौर्य गाजवले ते कधीही न विसरण्यासारखे आहे, त्यामुळे आजचा हा दिवस एक सण आहे असे समजून आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि यापुढे देखील करत राहणार असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!