ज्येष्ठ संपादक राजूभाई शहा यांचे दु:खद निधन !
प्रतिनिधी, पेण
पेण येथील प्रसिद्ध पत्रकार व रायगड ध्वनी समाचारचे संपादक, जेष्ठ पत्रकार राजू तथा रजनीकांत नरोत्तमदास शहा यांची ८ जुलै रोजी अचानकपणे तब्येत बिघडल्याने त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवार दिनांक १२ जुलै रोजी पहाटे २:४५ च्या सुमारास रुग्णालयातच दु:खद निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
दैनिक सामना सह अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केले होते. सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकीय नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. आपल्या वृत्तपत्रातून विविध सामाजिक समस्या मांडून अनेक न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले होते.
राजू शहा यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्याच्या राहत्या घरी पुजा अपार्टमेंट,प्रेमनगर चिंचपाडा येथे ठेवण्यात आले होते. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकार आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी पेण येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहीली.

