श्री स्वामी समर्थ समाधी मठात प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन !
श्री स्वामींच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे श्री अनुप गुरुजी यांचे आवाहन
राजमुद्रा न्यूज नेटवर्क, अक्कलकोट
अक्कलकोट येथील बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज अनुप महाराज यांनी दिली.
गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त गुरुवारी (दि. 10) पहाटे दोन वाजता ‘श्री’ ची काकडा आरती सोहळा होणार आहे. त्यानंतर देश-विदेशातून आलेल्या भक्तांना रांगेत दर्शनाची सोय करण्यात आली असून या सर्व भाविकांचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून समाधी मठ खुला राहणार आहे. सकाळी सात वाजता श्री स्वामी महाराजांचे परमभक्त श्री चोळप्पा महाराजांना दिलेल्या मूळ पादुकांचे पूजन व श्री गुरु पाद्यपूजा सोहळा व अभिषेक अनुप महाराज व त्यांच्या धर्मपत्नी सौ.आदिती पुजारी यांच्या हस्ते प्रति वर्षाप्रमाणे होणार आहे. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात हा भक्तिमय सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर ‘श्री’नां वस्त्रालंकार करण्यात येणार आहे. महाप्रसादाचे नैवेद्य सकाळी ठीक नऊ वाजता दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना अनुप महाराज परिवारातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. सदरचा महाप्रसाद वाटप दुपारी तीन वाजेपर्यंत चालणार आहे. दुपारी बारा वाजता महानैवेद्य आरती होणार आहे. सायंकाळी पाच ते सात वाजता विविध भजन मंडळाच्या वतीने भजन संध्या हा कार्यक्रम होणार आहे. रात्री आठ वाजता श्रीं ची आरती व पालखी होणार आहे. यावेळी गुरुवारी अंतर्गत पालखी सोहळा मठात होणार असून यावेळी पारंपरिक बँड वाद्य सोहळा संपन्न होणार आहे. तसेच समाजातील गरजू व गरीब महिलांना वस्त्रदान अर्थात साडी वाटप होणार आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण समाधी मठाला विविध पुष्पमाला आणि शहाळे यांची सजावट करण्यात येणार आहे. बुधवारी रात्री आठ वाजता वाडी पूजा मंगलमय सोहळ्यात होणार आहे, तरी सर्व भाविकांनी या मंगलमय वातावरणात श्रीं च्या दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. अनुप महाराज यांनी केले आहे.

