झाडा – झुडपांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा
अंकुर ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

राजमुद्रा न्यूज नेटवर्क, पेण
जागतिक तापमानवाढीच्या बाबतीत जनजागरण व्हावे या उद्देशातून अंकुर ट्रस्ट च्या आदिवासी मुलांनी परिसरातील झाडा-झुडुपाना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केले.
राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. अंकुरच्या मुलांनी या स्नेहरूप बंधनाचा प्रतीकात्मक रूपाने निसर्गाची बांधिलकी कृतीतून स्विकारली.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील संस्थापक असलेल्या अंकुर ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेत एकुण ७० कातकरी व स्थलांतरित मजुरांची मुले शिक्षण घेत आहेत. आज या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात नसरीन मणियार, दिपाली व संदिप फडणीस, विलास पाटील व संस्थेचे विश्वस्त ए. राज हे उपस्थित होते. या वेळेस आदिवासी बालकांनी उपस्थित महिला पाहुण्यांना राखी बांधून झाडांना राख्या बांधून पर्यावरण पुरक रक्षा बंधनास सुरूवात केली.

आदिवासी बालकांना अंकुर च्या कार्यकर्त्यां श्रृती तिमाने यांनी इको फ्रेंडली राख्या बनवायला शिकवल्या. या वेळेस श्रीमती. फडणीस यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तर नसरीन मणियार यांनी मिठाई वाटप केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी विद्यार्थीनी चैताली आखाडे हिने केले तर आभार प्रदर्शन स्नेहल जाधव हिने केले. या कार्यक्रमासाठी लंकेश गवस व किर्ती सुर्वै यांनी परिश्रम घेतले.
