खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील वृक्षतोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष !
प्रतिनिधी, पेण
पेण तालुक्यातील खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे खरोशी येथील सर्वे नंबर २०८ ब, ४१, ४३/१,४३/२, ४४/१, ४४/२, ४४/२, लगत दोन दिवसांपूर्वी वनसंपदेसह साग, आंबा यांसह इतर जंगली झाडांची वृक्षतोड करण्यात आली असताना वन विभागाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दरम्यान खरोशी ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननासाठी या परिसरात वारंवार वृक्षतोड होत असताना वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे अशा अवैध्य वृक्षतोडीला वनविभागाचा छुपा पाठिंबा आहे का ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी विचारला आहे. याबाबत त्यांनी २९ जून रोजी शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या मुख्य सचिवांकडे तक्रारही दाखल केली आहे.

सदर तक्रारीमध्ये संतोष ठाकूर यांनी तलाठी सजा दुश्मी हद्दीतील वनेतर कामास बंदी असलेल्या मौजे घोटमाळ येथील सर्वे नंबर ८८/२३, ८८/२४, ८८/२५, ८८/२६ (महाराष्ट्र वनखाते) मधून मागील सहा महिन्याहून अधिक कालावधीपासून अवैद्य पद्धतीने दगड खाण उत्खननातून निघणाऱ्या गौण खनिज मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांसाठी रस्ता बनवून त्यावरून दिवसाला शेकडो अवजड वाहने ये-जा करीत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी पेण यांनी संबंधितांवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची गुन्हे नोंद प्रक्रिया किंवा सदर वन जमिनीतील अवैद्य वाहतूक बंद केली नसल्याने संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी पेण व वन परिमंडळ खारपाडा येथील वनरक्षक यांचेवर नियमोचित कारवाई करण्याचीही मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केली आहे.





