ठळक बातम्याताज्या बातम्या

खुशबू ठाकरेच्या चौकशीचा अहवाल मिळणार !

प्रतिनिधी, पेण

वरवणे आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणारी खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा २२ जानेवारी २०२५ रोजी चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला सहा महिने झाले तरी गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच चौकशी अहवाल पोलिसांना दिला जात नाही. याविरोधात ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने तहसीलदार कार्यालयसमोर बुधवारी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र, तहसीलदारांनी लेखी हमी देत अहवाल मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्यामुळे संस्थेने ठिय्या आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत स्थगित केले आहे.

पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडीमध्ये राहणारी खुशबू ठाकरे वरवणे आदिवासी आश्रमशाळेत शिकत होती. १६ डिसेंबर २०२४ रोजी कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम तपासणीत तिच्या अंगावर चट्टे दिसले. त्यावरून ती कुष्ठरोगी असल्याचा निष्कर्ष काढून १८ डिसेंबरपासून तिच्यावर कुष्ठरोगावरील उपचार सुरू केले. कोणताही आजार नसताना कुष्ठरोगाचे उपचार केल्यामुळे खुशबूच्या अंगावर फोड आले, अंग सुजले. तिची तब्येत खालावली. त्यानंतर आश्रमशाळेने तिच्या वडिलांना बोलावले. तिच्या वडिलांनी खुशबूला कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात नेले. तिथे उपचार सुरू असताना २२ जानेवारीला तिचा मृत्यू झाला.

खुशबूचे मृत्यू प्रकरण आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खुशबूचे वडील नामदेव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आधीपासून केला आहे. खुशबूच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांना डावलून राज्य सरकारला दिल्याने या अहवालावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणूनच ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी खुशबूच्या मृत्यू प्रकरणी जाब विचारला. मात्र, त्यांची कुणीही दखल घेत नव्हते. रायगडमधील आमदार, मंत्री यांनीही खुशबूच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप होत आहे.

या पार्श्वभूमिवर खुशबूच्या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेसह खुशबूचे पालक, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी १६ जुलैपासून तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे बुधवारी ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. त्यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ, पोलीस निरीक्षक संदीप बागुल आंदोलनस्थळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल, केमिकल एनालिसिस रिपोर्ट उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न केले जातील असे सांगत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले. त्याला प्रतिसाद देत ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, १५ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे.

यावेळी खुशबूचे वडील नामदेव ठाकरे, आई शेवंती ठाकरे, आजोबा राघ्या ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश रसाळ, महेश पाटील, ग्राम संवर्धन समिती सदस्य नरेश कडू, महादेव शीद, अशोक शिद, लक्ष्मण मेंगाळ, नरेश ठाकरे, गणेश ठाकरे, जानू वाघमारे, चंद्रकांत खाकर, नरेश कडू, नामदेव केवारी, हरी शिद, सोपान निवळकर, मीनल तांडे यांच्यासह अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!