घरफोडी करणाऱ्याच्या पेण पोलिसांनी २४ तासात मुसक्या आवळल्या
दुकान फोडून २० हजार केले होते लंपास
राजेश प्रधान, पेण
पेण शहरातील एका आईस्क्रीमच्या दुकानाचा दरवाजा तोडून २० हजार रुपयांवर डल्ला मारणाऱ्या चोराच्या पेण पोलिसांनी २४ तासात मुसक्या आवळून गजाआड केले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, पेण शहरात गुरुकृपा आईसक्रिम पार्लर नावाचे दुकान आहे. गुरुवार दिनांक १९ रोजी रात्री ११ च्या सुमारास एका चोराने या दुकानाच्या पाठीमागील दरवाजाचा पत्रा तोडुन त्यामध्ये हात घालुन आतील कडी उघडली व दुकानातील गल्ल्याच्या ड्रॉवरचा लॉक हत्याराने उघडुन घरफोडी करून २० हजार रुपये रोख व कागदपत्रे चोरी करण्यात आली होती.
पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग यांच्या पथकाने गोपनीय तसेच तांत्रीक बाबीच्या आधारे शोध घेवुन गणेश विशाल मेहर वय- २९ वर्षे रा.गोकुळ नगर, फणसडोगंरी पेण याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, प्रकाश कोकरे, संतोष जाधव राजेंद्र भोन, सचिन होस्कोटी, सुशांत भोईर, अजिंक्य म्हात्रे, गोविंद तलवारे, अमोल म्हात्रे यांनी केली या प्रकरणी विशेष मेहनत घेऊन चोराला गजाआड केले. गणेश विशाल मेहर कडुन चोरलेले रूपये २० हजार हस्तगत करण्यात आले आहेत.

