पहिल्याच पावसात ‘महावितरणची बत्ती गुल’
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पेणमध्ये २४ तास विद्युत पुरवठा खंडित.
प्रतिनिधी, पेण
पेण तालुक्यात बुधवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसामुळे आणि वादळामुळे महावितरणची बत्ती पेण तालुक्यात काही ठिकाणी सुमारे २४ तास गुल झाली आहे. तर काही काही भागांमध्ये तासा-तासाने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये महावितरण विरोधात रोष निर्माण झाला आहे.
पेण तालुक्यात वीज वितरण कंपनी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. तालुक्यातील वीज वितरण यंत्रणा अतिशय जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या अडथळा निर्माण करतात. काही भागांत खांब मोडकळीस आलेले असून, वायरिंगही अतिशय जुनी व कमकुवत आहे. त्यामुळे हवामानात थोडासा बदल झाला तरी वीज बंद होते आणि दीर्घकाळ येत नाही. थोडी हवा, थोडा पाऊस आणि बत्ती गुल अशी परिस्थिती पेण तालुक्याची झाली आहे.
पेण शहर आणि तालुक्यात, बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास वीज गेली ती रात्री अडीचच्या सुमारास आली. अवकाळी पावसामुळे काल पेण तालुक्याला झोडपून काढले. या पावसामुळे महावितरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामे कामांची पोलखोल झाली आणि महावितरणाची अशी स्थीती अजुन पावसाचे चार महीने जायचे बाकी आहेत कसे होणार असा विचार नागरिकांना पडला आहे. नाममात्र पाऊस पडूनही वीज जात असल्याने सामान्य नागरिकांनी महावितरण विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या वीज जाण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर झाड पडल्याने वीज गेल्याचे सांगण्यात येते. वास्तविक पावसाळा सुरु होण्याच्या आधी वाढलेल्या झाडांची छाटनी केली जाते. त्यामुळे पावसाळ्या आधीची कामे वेळेवर न केल्याने आणि महावितरणाच्या हलगर्जीपनामुळे ही अवस्था आहे.
पावसाळा अद्याप सुरू झाला नाही तर महावितरणच्या विजेचा सावळागोंधळ सुरू झाला असून अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे. रात्री वीज पुरवठा नसल्याने चोरांना आयती संधी मिळते. त्यामुळे याचा धसका नागरिक घेताना दिसत आहेत. यात जर सुधारणा झाली नाहीतर अनेक संघटना आणि नागरिक आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.





