ई पॉस मशीन चालेना ! रेशन धान्य वितरणात अडथळे
सर्व्हर डाऊनमुळे अनेक लाभार्थी वंचित
तहसीलदारांचे आदेश धाब्यावर ?

अरविंद गुरव, पेण
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत रेशन दुकानातून लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण करण्यात येते. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून ई-पॉस मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे लाभार्थी धान्य घेण्यापासून वंचित राहत असून, उर्वरित धान्य लाभार्थ्यांना वेळेवर मिळावे यासाठी संबंधित विभागाने पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पेण येथील रेशनिंग दुकानावरील वाटप ई- पॉस मशीनच्या सर्व्हर डाऊन असल्याने थांबून राहिलेली आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होऊन लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. संपूर्ण तालुक्यात सर्व्हर डाऊन असल्याने वाटपात अडथळे येत आहे. पेण तालुक्यात एकूण ११६ रेशनिंग दुकाने असून त्या सर्व दुकानावर अंत्योदय ग्राहक संख्या सुमारे २९ हजार तर अन्न सुरक्षा लाभार्थ्यांची संख्या सुमारे १ लाख ३० हजार एवढी आहे. या पैकी फक्त ३० टक्के लाभार्थ्यांना धान्याचे वाटप झाले असून सुमारे ७० टक्के ग्राहक लाभापासून वंचित राहिले आहेत. धान्य घेण्याच्या लाभा पासून वंचित राहिलेले काही लाभार्थी रेशनिंग दुकानाच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र रेशनिग दुकानदार थम शिवाय धान्य देता येणार नाही अशी उत्तरे देत आहेत.

तहसीलदारांचे आदेश धाब्यावर ?
तिन दिवसांपूर्वी ऑफ़लाइन पद्धतीने लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करावे असे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. मात्र तहसीलदारांनी आदेश देउनही पेणमधील काही रेशनिंग दुकानदार लाभर्थ्यांना जो पर्यंत ई पॉस मशीन (थम) सुरु होत नाही तो पर्यंत धान्य दिले जाणार नाही असे सांगत आहेत. पेणमधील रेशनिंग दुकानदार तहसीलदारांचे आदेश धाब्यवर बसवून ग्राहकांना लाभापासून वंचित ठेवत आहेत आणि शासनाकडू लाभार्थ्यांसाठी आलेल्या धान्याची साथवणुक करीत आहेत.
मुदतवाढ मिळावी
दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या कार्डधारकांना मोफत धान्य देणे अनिवार्य आहे. मात्र सर्व्हर डाऊनमुळे बरेचशे कार्डधारक धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे अशा कार्डधारकांना त्यांचे धान्य मिळावे, यासाठी मुदतवाढ मिळावी व त्यांना धान्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
