क्रीडा

पेणचे रमेश खरे यांना राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक !

(अरविंद गुरव, पेण)

इंदौर येथे राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विपड आणि अनईक्विपड स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघातून मास्टर्स पुरुष (७० वर्षावरील) गटासाठी रायगड जिल्ह्यातील पेण येथील हनुमान व्यायामशाळेतील रमेश (आप्पा) खरे यांची निवड ६६ किलो वजनी गटासाठी झाली होती. ज्येष्ठ पॉवरलिफ्टिंग खेळाडू रमेश खरे (वय ७५ पूर्ण) यांनी एकूण २०५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले आहे. स्कॉट या प्रकारात ६६ किलो, बेंच प्रेस प्रकारात ५५ किलो आणि डेडली प्रकारात ९० किलो असे एकूण २०५ किलो वजन खरे यांनी उचलले. त्याबद्दल त्यांना गटातून पहिले आणि इतर प्रकारातील ही पहिले अशी एकूण चार सुवर्णपदक प्राप्त झाली आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हेड मेकॅनिक या पदावरून सेवानिवृत्त झालेले आणि गुरव आळी येथे वास्तव्यास असलेले रमेश खरे हे हनुमान जिमचे संचालक, राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग पदक विजेते दाम्पत्य राजेश अंनगत आणि मयुरा अंनगत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत तसेच शरीरसौष्ठव पंच असून रायगड जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेवर कार्यरत आहेत.

रमेश खरे यांनी मिळवलेल्या या सुवर्णपदकळाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्टस असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, सहसचिव सचिन भालेराव, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य संदीप पाटकर, सुभाष टेंबे, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, माधव पंडित आणि सचिव अरुण पाटकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. खरे यांनी या वयात सुवर्णपदक प्राप्त करून एक प्रेरणादायी आदर्श आजच्या रायगड जिल्ह्यातील तरुण पिढीला दिला आहे, असे गौरवोद्‌गार महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई यांनी काढले. तसेच रमेश खरे यांचे पेणकरांकडून ही कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!