पेणच्या कलाकारांच्या पुढाकाराने “बाप पण भारी देवा” नाट्याची निर्मिती

राजेश प्रधान, पेण
गणपतीच्या मूर्तींकरिता प्रसिद्ध असलेले पेण येथील कलाकारांनी नाट्यनिर्मितीतही आपले कसब दाखवीले आहे. पेणच्या कलाकारांच्या पुढाकाराने “बाप पण भारी देवा” या धमाल विनोदी नाटयाची निर्मिती करण्यात आली आहे. दत्त अवधुत एंटरटेनमेंट निर्मित, श्री गणेश प्रॉडक्शन प्रकाशित, दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट ह्यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. पेण येथील कौस्तुभ भिडे व राजा अत्रे यांच्या पुढाकाराने सदर नाटक नाट्य रसिकांच्या भेटीला येत आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना पेणचे नाट्यनिर्माते कौस्तुभ छाया विलास भिडे म्हणाले की, नाट्य रसिकांना दर्जेदार विनोदी नाटक देण्याचा दृष्टीने आम्ही ही कलाकृती सादर केली आहे. या नाटकात एका अनपेक्षित पाहुण्याच्या आगमनाने एका सामान्य कुटुंबात उडालेला गोंधळ, त्या गोंधळात तो पाहुणा नेमका कोणामुळे आला याचे गुढ, आणि संशय घरातल्या माणसांवरच, त्यात सर्वात मोठी कसरत म्हणजे त्या पाहुण्याला आई पासुन लपवायचे, हे सर्व घडत असताना प्रेक्षकांची खळखळून हसण्याची खात्री हे नाटक देते. तसेच कुटुंबातल्या मुलांचा भाबडेपणाही नाट्य रसिकांना पोट धरून हसायला भाग पाडतो. त्यामुळे हे नाटक सर्व नाट्यसिकांनी पाहायलाच पाहिजे असे आवाहन निर्माते कौस्तुभ भिडे यांनी केले.
या विनोदी नाट्यचे लेखन दर्शना कुलकर्णी ह्यांनी केले असुन राजा अत्रे ह्यांनी ही नाट्यकलाकृती दिग्दर्शित केली आहे. या नाटकात झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार देवेंद्र सरदार आणि वेड चित्रपटातील कलाकार आनंद पाटील तसेच टिव्ही मालिकांमध्ये काम करणारे कलाकार स्वप्निल साने, दर्शना कुलकर्णी, नेहा पाटील, साहिल परब, मयुरेश पाटील, राकेश म्हात्रे व रिल स्टार राजश्री कोळी, आदिती पाटील यांनी काम केले आहे. पार्श्व संगीत निखील सागळे, रंगभूषा राजेश परब, वेशभुषा ऋषिकेश घाग, प्रकाश योजना दीप घाडगे, नेपथ्य शंतनु पंदेकर आणि केविन यांनी केले असुन सुत्रधार म्हणुन सुरेश भोसले हे काम पहात आहेत.
“बाप पण भारी देवा” ह्या नाटकाचे शुभारंभाचा प्रयोग शनिवारी दिनांक १० ऑगस्टला दुपारी ४ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे तसेच १७ ऑगस्ट रोजी शनिवारी दुपारी ४:३० वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली आणि ३१ ऑगस्ट रोजी शनिवारी रात्रौ ८:३० वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे होणार आहेत.

