राज्यात उद्यापासुन मद्य महागणार, ९ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढ; खरेदीसाठी आज तळीरामांनी केली तोबा गर्दी !
राजमुद्रा न्यूज नेटवर्क, रायगड
आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशी, विदेशी मद्याच्या दरात ९ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, परवाना शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे राज्य सरकारला दरवर्षी १४ हजार कोटी रुपयांच्या महसुलाची भर पडण्याची शक्यता आहे.
उद्यापासुन मद्याचे दर वाढणार असल्याने आज तळीरामांनी मद्याच्या दुकानावर मद्य खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. मात्र मद्याच्या दुकानात पुरेसामद्याचा साठा नसल्याने काही ग्राहक परत जात होते तर काही ग्राहक पुढील महिनाभराचा मद्यसाठा जमा करत असल्याचे दिसत होते. तळीरामांच्या वाहनांमुळे काही काळ ठीक-ठिकाणी वाहतूकिला अडथळा निर्माण झाला होता.
राज्य सरकारने यापूर्वी २०२२ मध्ये देशी दारूच्या दरात वाढ केली होती. मात्र भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या दरात २०११ पासून वाढ झाली नव्हती. त्यामुळे १४ वर्षांनंतर त्याच्या दरात ७० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

