रानबाजिरे धरणात आले देवळे धरणातून लालमाती अन् गाळाचे पाणी !
बॅकवॉटरचा जलाशय यंदा होणार उथळ

शैलेश पालकर, पोलादपूर
महाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे येथील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये यंदा देवळे धरणाचे लालमाती गाळाचे पाणी वाहून आल्याने यावर्षी बॅकवॉटरचा जलाशय उथळ होणार आहे. यामुळे एमआयडीसीने तातडीने या बॅकवॉटरच्या जलाशयातील गाळाचा उपसा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलादपूरनजिकच्या कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे या महाड एमआयडीसीसाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे स्वरूप चिरेबंदी दगडी बांधकाम आणि सांडव्यांच्या भागास काँक्रीटचे अस्तरीकरण तर स्टेलिंग बेसिसच्या भागात सांडव्यांतून येणारे पाणी साठविण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात आलेले असे आहे. या धरणाची लांबी 320 मीटर्स असून सांडवा 121.84 मीटर्स आहे. 8 सांडव्यांवरील दरवाजे 12 मीटर्सचे प्रत्येकी आहेत. उच्चालक मोटर क्षमता 10 अश्वशक्ती आहे. धरणाची क्षमता 40 मे.टन आहे. पाणीसाठा 61.50 मीटर पातळीवर 29.95 दशलक्ष घनमीटर तर 55 मीटर पातळीवर 16.49 दशलक्ष घनमीटर असतो. मृतसाठा 3.6 दशलक्ष घनमीटर असून 61.50 पातळीवर वापरण्यायोग्य पाणीसाठा 26.32 दशलक्ष घनमीटर आणि 55 मीटर पातळीवर पूर्ण संचय पातळी 61.50 मीटर आहे. सांडव्यांची पातळी 55 मीटर आहे. भिंतींची पातळी 64.70 मीटर आहे. धरणाची महत्तम उंची 33.615 मीटर असून पाणलोटक्षेत्र 197.257 चौ.कि.मी इतके आहे. या धरणामुळे 2.70 चौ.कि.मी. बुडीत क्षेत्र झाले आहे. सांडव्यांची क्षमता 3248.134 घनमीटर प्रतिसेकंद एवढी आहे. या धरणाची आपत्कालीन दरवाजे, विद्युत जनित्र आणि उच्चालक क्षमता अशी ठळक वैशिष्ठयेही आहेत. पूरकाळात धरण भरलेले असताना 58.10 मीटर पाण्याची पातळी असते. सध्या येथील पाण्याची पातळी 51.50 मीटर एवढी असून 43 आरएलपर्यंत पाण्याची पातळी खाली करण्याची परवानगी आहे. मात्र, चार वर्षांपूर्वी धरणाच्या बॅक वॉटरची पातळी 43 आरएलपेक्षाही कमी करण्यासाठी सर्व सांडव्यांसह सर्व्हिस गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 2022 या वर्षी झालेल्या 61.50 मीटर पातळीवर 29.95 दशलक्ष घनमीटर पाणीसाठयापैकी 22 मिलीयन क्युसेक पाणीसाठा धरणाचे सहा सांडवे खुले केले असताना अस्तित्वात होता. या सहा सांडव्यासोबतच दोन सर्व्हिस गेटसदेखील उघडण्यात आल्याने साधारणपणे प्रतिसेकंद 25946 घनमीटर पाणीसाठयाचा विसर्ग झाला. यामुळे पुराच्या पाण्याचा महाड शहराला 2022 मध्ये फटका बसला नव्हता. मात्र, 2023 मध्ये पावसाळयापूर्वी केवळ स्टेलिंगबेसिसच्या जलाशयाचे पाणीच रिकामे करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा 2023 मध्ये महाड शहराला पुराच्या पाण्याचा काही भागात सामना करावा लागला होता.
देवळे लघुपाटबंधारे धरण प्रकल्प योजनेच्या दुसऱ्या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये कामासाठी 4 कोटी 68 लाख 1 हजार 876 रूपये आणि अनुषंगिक खर्चापोटी 68 लाख 96 हजार 855 रूपये अशी एकूण 5 कोटी 36 लाख 98 हजार 731 रूपये अशी मंजूरी 31 मार्च 2005 रोजी मिळाली. या कामाची सुरूवात मार्च 1997 मध्ये झाली. मात्र, बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम न मिळाल्याने तसेच भूसंपादनात जमिनीचा दर कमी लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी 1998 मध्ये योजनेचे काम बंद केले होते. साधारणत: 2001 मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात भूसंपादनाचा मोबदला अदा केल्यानंतर मे 2003 मध्ये योजनेचे घळभरणीचे काम पूर्ण करून पाणीसाठा करण्यास सुरूवात केली. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या या धरणात पाणीसाठा होत असल्याची चाचणी घेतल्या-घेतल्याच धरणाची गळती सुरू झाली. यानंतर 27 मे 2024 रोजी शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाच्या कार्यक्रमप्रसंगी तत्कालीन आमदार व विद्यमान मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांनी देवळे धरण मुळापासून उकरून नव्याने 87 कोटींचे धरण बांधण्याची घोषणा केल्याप्रमाणे पंढरपूर येथील मोरे ठेकेदार याकामी गेल्या वर्षापासून सक्रीय झाले आहेत. यंदा पोलादपूर तालुक्यातील देवळे येथील धरण मुळापासून उच्चाटन करण्यात आल्याने सावित्री नदीपात्रावरील या धरणाचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. या धरणाचा बांध, त्यावरील दगडी पिचिंग, एकमेव लोखंडी दरवाजा, बँकवॉटरच्या जलाशयातील माती असा सर्वच परिसर यंदा पूर्णपणे गायब झाला आहे.
परिणामी, रानबाजिरे धरण यावर्षीपासून सावित्री नदीपात्रावरील एकमेव धरण ठरले आहे. यंदा रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरच्या जलाशयामध्ये देवळे धरणापासून मोठया प्रमाणात लालमाती आणि गाळ वाहून घेणारे सावित्री नदीचे पात्र येऊन सर्व सहा सांडव्यातून मोठया प्रमाणात गाळासह पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गेल्यावर्षी धरणाच्या बॅकवॉटर आणि पुढील बाजूच्या स्टेलिंग बेसिस जलाशयाची खोली गाळ साठल्याने कमी झाल्याचे निदर्शनास आले असून पावसाळयानंतर तातडीने नाम फाऊंडेशनच्या तज्ज्ञांचे पथक रानबाजिरे धरणाच्या परिसराचे अवलोकन करणार असल्याची माहिती ‘नाम’ जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी ‘नाम’चे तालुक्यातील कार्यकर्ते हेमंत भोईटे यांच्यासह प्रस्तुत प्रतिनिधीजवळ वार्तालापादरम्यान दिली. रायगड जिल्हा परिषदेचे यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनीदेखील या तज्ज्ञांसोबत चर्चा केली. मात्र डॉ.पाटील यांच्या बदलीमुळे धरणाच्या बॅकवॉटरच्या आणि स्टेलिंग बेसिसच्या जलाशयांची खोली वाढविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल अथवा कसे, याबाबत साशंकता निर्माण झाली असताना विद्यमान मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांनी देवळे धरण मुळापासून उकरून नव्याने धरण बांधण्याची घोषणा केल्यानुसार सद्यस्थितीत देवळे धरण पूर्णपणे गायब झाले असून रानबाजिरे धरण हेच सावित्री नदीवरील पोलादपूर तालुक्यातील एकमेव धरण राहिले आहे.



