रायगडमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी, आज अतिवृष्टीचा इशारा
राजमुद्रा न्यूज नेटवर्क, रायगड
मागील दोन दिवसांमध्ये कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही कोकणात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. रायगडमध्येही आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधारेमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी साठले आहे, त्यामुळे रायगडमधील पाच तालुक्यामधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचे गंभीर परिणाम लक्षात घेता, अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूरया तालुक्यांतील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालयांना दि. १९ जून २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे.




