राष्ट्रवादी (अजित पवार गटाच्या) माध्यमातून नागरिकांसाठी हेल्पलाईन कार्यरत !
पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार पाटील यांनी दिली माहिती.

संजय कदम, पनवेल
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राज्यातील नागरिकांच्या समस्या आणि महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार पाटील यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ९८६१७१७१७१ असा हेल्पलाईन नंबर हा व्हॉटसअप नंबर असून यावर नागरिकांनी पाठविलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी २४ तासांमध्ये त्या त्या तक्रारदाराला त्याच्या समस्येविषयी दखल घेतल्याचा संदेश जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, ही हेल्पलाईन पक्षाच्यावतीने सरकारी योजनांशी संबंधित लाभार्थी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच त्यांना मदत देण्यासाठी कार्यरत करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांच्या माहितीचा अभाव पाहता, या हेल्पलाईनद्वारे माहिती उपलब्ध करून देत त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हा उद्देश ठरविण्यात आला आहे. यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांपासून ते बूथ अध्यक्ष या पदापर्यंतचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यासाठी उपलब्ध राहणार आहेत. तसेच सदर उपक्रमाची सुरुवात नुकत्याच यशस्वी झालेल्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीबीटी) आणि लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्याच्या निमित्ताने करण्यात आली असल्याची माहितीही पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार पाटील यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव, प्रदेश सचिव शिवदास कांबळे, महिला प्रदेश सचिव रत्नमाला पाबरेकर, कार्याध्यक्ष राजकुमार पाटील, महिला जिल्हाधियक्ष प्रज्ञा चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष मंगेश नेरुळकर, रेखा दांडेकर, अश्विनी भोसले, किरण अडागंळे, महिला जिल्हा सरचिटणीस वंशिका पडवळ, महिला जिल्हा सचिव स्नेहल गुरव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
