राजकीय

राजकीय संख्येचा हिशोब कळला नाही त्यांनी माझ्या खासदारकीचे मोजमाप करु नये –  खासदार धैर्यशील पाटील

धैर्यशील पाटील शांत, संयमी, कर्तुत्ववान व्यक्तिमत्व – रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

अरविंद गुरव / राजेश प्रधान, पेण

आज पेणमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रती कृतज्ञता सोहळा मोठ्या थाटात भारतीय जनता पक्ष, रायगड तर्फे साजरा करण्यात झाला. या वेळी लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविक करते वेळी धारप यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भल्याभल्यांना अशक्य वाटणारी गोष्ट रविंद्र चव्हाण हे शक्य करून दाखवतात. राज्यसभेसाठी रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्या सारख्या दिग्गज उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्कारावा लागला. मात्र रायगड आणि कोकणामधील भाजप आणि मित्र पक्षाचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची किमया रविंद्र चव्हाण यांनी करून दाखवली. तसेच आम्ही थोडेसे स्वार्थी आणि लबाड कार्यकर्ते तुमचा आज सत्कार करून पुढे काहीतरी पदरात पाडून घेण्याची आमची इच्छा आहे. तुमच्या नेतृत्वाखाली या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व कार्यकर्ते आज तुम्हाला शब्द देतो की या जिल्ह्यात तीन चे चार आमदार कमळाचे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही फक्त आपला प्रेमाचा आशीर्वाद, आपला सहवास, आपलं पाठबळ हे आम्हाला सतत मिळत राहो हीच माझ्या प्रस्ताविकाची मुख्य भूमिका आहे असे धारप यांनी सांगितले.

कृतज्ञता सोहळ्यामध्ये उपस्थितांना संबोधतांना खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील व केंद्रातील नेतृत्वाने मला पक्षात सामावून घेऊन मला खासदारकी बहाल केली. मात्र या पक्ष निवडीचे राजकारण कुणाला पचले कुणाला नाही पचले. माझे समर्थक कार्यकर्ते आनंदले, पण काकांच्या कपाळावर आठ्या पडल्या. हा सतरा महिन्याच्या कालावधी यात काय काम करेल ? असा सवाल त्यांना पडला. ते म्हणतात यातील सहा महीने आचार संहीतेत जातील तर सहा महिने संसद भवन सभागृहातील कामकाज समजायला लागतील उरलेल्या पाच महिन्यात काय काम करेल असे ते काळजीने बोलतात. काका आता माझी काळजी करण्याचे कारण नाही कारण दुसरे काका माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ राहून मला या पदावर नेण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. मला दिलेला शब्द भाजप नेतृतवाने पाळून खासदार केले. एका काकांना सोडले आता दुसरे काकांसोबत भाजपचे काम निष्ठेने करेन. मला यातील जरी एक दोन महिने काम करावयास मिळाले तरी मी असं काम करेन की भाजपचे कमळ रायगड जिल्हात फुलविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही हा माझा शब्द आहे.

शेकापक्षाच्या जिल्हा परिषदेत २४ जागा निवडून आल्या होत्या आणि १२ जागा आलेल्या पक्षाला काकांनी अध्यक्ष पद दिले. त्यावेळी “राजकीय संख्येचा हिशोब या काकांना कळला नाही त्यांनी माझ्या खासदारकीचे मोजमाप करु नये” अशी कोपरखळी मारत नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील पाटील यांनी शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता राजकीय शरसंधान साधले.

यावेळी सार्वजनीक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी धैर्यशील पाटील शांत, संयमी, कर्तुत्ववान व्यक्तिमत्व असून ते पक्षात सर्वाना बरोबरीने घेऊन काम करणारा सामान्य नेता आहे. कार्यकर्त्याच्या पायात भिंगरी असली पाहिजे, तोंडात साखर आणि त्याच्या डोक्यावर बर्फ असलं पाहिजे या गोष्टी तंतोतंत धैर्यशील पाटील यांच्यात असल्यामुळेच देशाचे नेते अमित शहा, राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस व चंद्रकांत बावनकुळे यांनी धैर्यशिल पाटील यांची खासदार म्हणून निवड केली. भाजप दिलेला शब्द पाळतो. “आता सुरेशभाऊ लाड तुम्ही सुध्दा रांगेमध्ये आहात, काळजी नसावी”. अशा शब्दात कर्जतकरांना धीर देत आपणा सर्वावर कोकणची मोठी जबाबदारी आहे ती आपण सर्वजण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

कृतज्ञता सोहळ्यामध्ये नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील पाटील यांचा कार्यकर्त्याकडून जंगी सत्कार करण्यात आला. पेणमध्ये पार पडलेल्या कृतज्ञता सोहळ्याला आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार विनायक नातू, खासदार धैर्यशिल पाटील, माजी आमदार सुरेश लाड, भाजप राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा  निवडणूक प्रमुख सतीश धारप, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मापारा, अँड. महेश मोहिते, माजी जि.प. अध्यक्षा नीलिमताई पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!