राजकीय

महायुतीला राज्यात पुन्हा सत्तेवर आणण्याकरिता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे –  सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा!

पेण – राजेश प्रधान

भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांच्या घराघरात जाऊन महायुतीच्या लोकप्रिय योजनांची माहिती देऊन महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्याकरिता जोमाने कामाला लागा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा कार्यकारणी बैठकीत कार्यकर्त्यांना केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक बुधवार दि. २४ जुलै रोजी पेण येथे भाजप कार्यालयात संपन्न झाली. भाजप दक्षिण जिल्हा रायगड उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा शाल श्रीफळ व श्री गणेश मूर्ती देऊन सन्मान केला.

जबाबदारीचे भान ठेवून काम करा, जबाबदारी झटकून चालणार नाही आपली लढाई बुथवर लढायची आहे. आत्ता कसोटी क्रिकेटचा जमाना नाही २०-२० चा आहे. आत्ता रिझल्ट देणे क्रमप्राप्त आहे.  रायगडातील सर्व मतदारसंघात जोमाने कामाला लागा. आपली ताकद सर्व ३९ मतदारसंघात दाखवा. महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीसांना बसविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्याला झोकून दिले पाहिजे. आगामी साडेतीन महीने मोलाची आहेत. विजय आपल्यासाठी सोपा आहे. कोकणात उजव्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे. सामान्यांच्या चुलीपर्यंत जाऊन देशाचे पंतप्रधान संवेदनशील आहेत हे समजून सांगा. बुथ प्रमुख, शक्ती संघ प्रमुख व कार्यकर्त्यांनी जनसंपर्क साधा. प्रत्येक सणांचा राजकीय लाभ घ्या भाजपच्या हिंदूत्वाचा ठसा उमटवा.

जर महायुतीचे सरकार आले नाही तर महाविकास आघाडीने जलयुक्त शिवार योजना बंद केली त्याचप्रमाणे मोफत रेशन योजना सुद्धा बंद करतील. ८० कोटी जनतेला मोफत रेशन मिळणार नाही. लाडकी बहिणी योजना सुद्धा बंद करतील व अडीच कोटी महिलांना आर्थिक मदत मिळणार नाही. हे सर्व शेवटच्या मतदारांपर्यन्त पटवुन सांगता आले पाहिजे. मोदी मँजीकचे व्हीडीओ पहा, त्यात ७० विषय मांडण्यात आले आहे. लोकांना भाजपच्या योजनांची माहिती द्या. महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस शिवाय पर्याय नाही हे सर्वांना सांगा. आपल्या मतदारसंघा व्यतिरिक्त इतर मतदारसंघात काम करा. देशाला महासत्ता बनविण्यासाठी निवडणूकीत यश मिळवीले पाहिजे असे मार्गदर्शन यावेळी चव्हाण यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,आमदार रवीशेठ पाटील,आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, गीता पालरेचा, युवानेते वैकुंठ पाटील, राजेश मापारा, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, मंगेश दळवी, संजय डंगर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद पाटील व संजय डंगर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!