सामाजिक

मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अनुत्तरीत !

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देताच केले पलायन

पेण – प्रतिनिधी

गेली १७ वर्ष रखडलेला आणि शेकडो जिव घेणारा कोकणच्या विकासाचा महामार्ग अशी ओळख असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहानीचा फार्स मागील वर्षी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केला होता. बांधकाम मंत्र्यांनी एका महिन्यात तब्बल सात वेळा मुंबई-गोवा महामार्गाची पहाणी केली होती. आणि नवनवीन डेड लाईनही दिल्या होत्या मात्र अद्यापही या महामार्गाचे काम अपूर्णावस्थेतच आहे.

काल पेण येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आले होते. यावेळी खड्डेमय मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर उत्तर न देताच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पलायन केल्याची घटना बुधवारी पेण येथे घडली.  पेण येथील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न विचारताच मंत्री महोदयांनी पलायन केले. मंत्री महोदयांच्या पलायनामुळे अजून किती वर्ष मुंबई गोवा महामार्ग अपूर्णच राहील हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल सात वेळा पाहणी दौरा केला होता. या पाहणी दरम्यान  प्रत्येक वेळी त्यांच्या समवेत बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अँथॉरिटी ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांचा ताफा असायचा. शिवाय ते दरवेळी न विसरता मुंबईच्या पत्रकारांचा ताफा सोबत घेऊन यायचे. रस्त्याचं काही झालंच नाही. या दौरयावरच रवींद्र चव्हाण यांनी लाखोंची उधळपट्टी केली. शिवाय गेल्या वर्षी खड्डे भरण्यासाठी १२ कोटींचे टेंडर काढण्यात आले असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारयांनी कोलाड येथे पत्रकारांनी केलेल्या आंदोलन आंदोलनाच्या वेळी सांगितले होते. रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर २०२३ पर्यत रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मागील सुमारे १५ वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग हा खड्ड्यातच गेलेला आहे. यावर्षी पुन्हा  महामार्गावरचे खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजे पुन्हा कोट्यवधींची उधळपट्टी होणार. महामार्ग पूर्ण करण्यापेक्षा दरवर्षी खड्डे भरणयावरच अधिक जोर देण्यात येत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. थोडक्यात मुंबई गोवा हायवे वरील खड्डे जरी भरले गेले नसले तरी ठेकेदारांच्या तिजोऱ्या मात्र शासन रीतसर भरत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!